Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई : अवैध गांजा लागवड प्रकरणात आरोपी अटकेत, 27.25...

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई : अवैध गांजा लागवड प्रकरणात आरोपी अटकेत, 27.25 लाखांचा मुद्देमाल जप्त…

0
517

 

दिनांक – 06/05/2026

गडचिरोली : जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या कारवायांवर आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी धडक कारवाई करत गांजाची लागवड करून विक्रीच्या तयारीत असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीच्या शेतातून तब्बल 27 लाख 25 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन धानोरा यांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

दिनांक 04 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, मौजा परसवाडी (ता. आरमोरी) येथील मोरेश्वर हिरामण उसेंडी (वय 58 वर्ष) हा आपल्या शेतात अवैधरित्या गांजाची लागवड करीत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांच्या उपस्थितीत आरोपीच्या शेताची झडती घेतली असता, शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली. तपासणीदरम्यान एकूण 54.5 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार (प्रति किलो 50 हजार रुपये) या मुद्देमालाची किंमत अंदाजे 27 लाख 25 हजार रुपये इतकी आहे.

प्राथमिक तपासात आरोपीने हा गांजा विक्रीच्या उद्देशानेच पिकवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन धानोरा येथे दिनांक 05 मे 2026 रोजी गुन्हा क्रमांक 62/2026 नोंदविण्यात आला असून, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(ब) व 20(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धानोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टेभुर्णे करीत आहेत.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, अशा अवैध कारवायांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here