Home सामाजिक अंगारा परिसरातील बी.सी. ग्राहकांचे खाते तातडीने अपडेट करा; आमदार रामदास मसराम यांचे...

अंगारा परिसरातील बी.सी. ग्राहकांचे खाते तातडीने अपडेट करा; आमदार रामदास मसराम यांचे निर्देश…

0
10

 

जोगीसाखरा (ता. कुरखेडा) – गडचिरोली जिल्ह्यातील मालेवाडा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा कार्यरत असून मालेवाडा ते अंगारा या परिसरातील अंतर लक्षात घेता बँकेने ग्रामीण भागात सेवा पोहोचवण्यासाठी ‘बँक मित्र (बी.सी.)’ नियुक्त केला आहे. हा बी.सी. ग्रामीण नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. बचत खाते उघडणे, पैसे जमा करणे व काढणे, आधार-सक्षम पेमेंट प्रणाली (AEPS) द्वारे व्यवहार, पीक कर्ज व इतर कर्ज सुविधा, तसेच प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना, विमा योजना आदी शासकीय योजनांची माहिती व अंमलबजावणी ही जबाबदारी या माध्यमातून पार पाडली जाते.

मात्र, अंगारा परिसरात नियुक्त बी.सी. मित्राकडून गंभीर गैरव्यवहार होत असल्याच्या धक्कादायक तक्रारी पुढे आल्या आहेत. स्थानिक नागरिक, विशेषतः महिला बचत गट, विधवा महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आमदार रामदास मसराम यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तक्रारींनुसार, अंगठ्याच्या माध्यमातून पैसे काढून प्रत्यक्षात कमी रक्कम देणे, अटल पेन्शन योजनेतील ₹1500 ऐवजी फक्त ₹1000 देणे, अपघाती विमा योजनेतील ₹2 लाखांपैकी केवळ ₹70 हजार देणे, खात्यातील जास्त शिल्लक कमी दाखवून उर्वरित रक्कम हडप करणे तसेच महिला बचत गटांच्या कर्ज वाटपात अनियमितता केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

या गंभीर बाबींची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी अंगारा परिसरातील बी.सी. ग्राहकांची तातडीची बैठक बोलावली. बैठकीत मोठ्या संख्येने महिला ग्राहकांनी उपस्थित राहून आपले अनुभव मांडले आणि बी.सी.च्या कामकाजाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आमदार मसराम यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या रीजनल मॅनेजरला स्पष्ट निर्देश दिले की अंगारा परिसरातील सर्व बी.सी. ग्राहकांची खाती तातडीने अपडेट करण्यात यावीत, संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

या बैठकीला सरपंच रेखा कोकोडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम, धनपाल मिसार, दादाजी सुकारे, जयदेव चिखराम, गोविंदा नरोटे, योगेश कोकोडे, रेवनाथ लांजेवार, अमित येरमे, रवी उईके, राजेंद्र कोकोडे, सचिन कुमरे, मारोती कापगते, दिलीप आचला, रविंद्र रायचवार, सुकदेव कोकोडे, रामजी कोकोडे, गणपत ढोक, पांडुरंग कापगते, सोमनाथ कोकोडे, भजन कापगते, उत्तम कोकोडे, ईदरशहा कोकोडे, जोसना सिडाम, शालू कोकोडे, साक्षी मेत्राम, पपिता कोवे, जयश्री कोकोडे, निवृता सडमाके, मंदा नाकाडे, पूनम चव्हारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला ग्राहक उपस्थित होत्या.

अंगारा परिसरातील बी.सी. सेवेमध्ये उघड झालेल्या गैरव्यवहारामुळे ग्रामीण बँकिंग व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आमदार रामदास मसराम यांच्या हस्तक्षेपामुळे आता या प्रकरणात ठोस कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्राहकांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here