Home ब्रेकिंग न्यूज महागाव हत्याकांडातील आरोपीला जामीन; हायकोर्टाचे स्पष्ट निरीक्षण “खटला संथ गतीने चालत...

महागाव हत्याकांडातील आरोपीला जामीन; हायकोर्टाचे स्पष्ट निरीक्षण “खटला संथ गतीने चालत असेल, तर आरोपीला अनिश्चित काळ तुरुंगात ठेवता येणार नाही”

0
164

 

गडचिरोली | प्रतिनिधी

अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडलेल्या राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कुंभारे कुटुंबातील पाच जणांच्या सामूहिक हत्येप्रकरणी दुसरी आरोपी मामी रोजा रामटेके हिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.

जामीन देताना न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत स्पष्ट केले की, “गुन्हा कितीही गंभीर असला, तरी खटला संथ गतीने सुरू असल्यास आरोपीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात डांबून ठेवणे योग्य नाही.

सुमारे अडीच वर्षांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागाव येथे कुंभारे कुटुंबातील पाच सदस्यांची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आली होती. कौटुंबिक वादातून सून संघामित्रा आणि मामी रोजा रामटेके यांनी अन्न व पाण्यातून विषारी द्रव्य मिसळून हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप आहे.

या घटनेत प्रथम पती-पत्नीचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांच्या विवाहित मुलगी, मावशी आणि मुलाचा मृत्यू झाला. सलग मृत्यूमुळे सुरुवातीला संशय निर्माण झाला नव्हता; मात्र नंतर तपासात धक्कादायक सत्य समोर आले.

 विषारी द्रव्य — धोकादायक ‘स्लो पॉयझन’…

या प्रकरणात वापरलेले विषारी द्रव्य अत्यंत जहाल स्वरूपाचे असून ते ‘स्लो पॉयझन’ म्हणून ओळखले जाते. याचा परिणाम हळूहळू होत असल्याने त्याचा शोध घेणे वैद्यकीयदृष्ट्या कठीण मानले जाते. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करणे तपास यंत्रणेसाठी मोठे आव्हान होते.

या गुन्ह्याचा उलगडा तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी अत्यंत शिताफीने केला होता. वैज्ञानिक पद्धतीने तपास करत त्यांनी या हत्याकांडामागील कट उघडकीस आणला आणि आरोपींना अटक करण्यात आली.

या प्रकरणातील मुख्य खटला अद्याप सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. आरोपीला मिळालेल्या जामीनामुळे पुन्हा एकदा हा संवेदनशील मुद्दा चर्चेत आला असून पुढील सुनावणींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गंभीर गुन्ह्यांमध्येही न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब हा आरोपींच्या जामीनाचा आधार ठरू शकतो, हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे न्यायप्रक्रिया वेगाने पार पडण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here