Home ब्रेकिंग न्यूज रोड वर अचानक कार पेटली, मोठा अनर्थ टळला; सैनिकी शाळेच्या परीक्षेला जाताना...

रोड वर अचानक कार पेटली, मोठा अनर्थ टळला; सैनिकी शाळेच्या परीक्षेला जाताना कारला भीषण आग, चालक व मुलगा थोडक्यात बचावले…

0
222

 

गडचिरोली :

सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्याच्या कारला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. देसाईगंजहून गडचिरोलीकडे येत असताना चुरमुरा गावाजवळ हा प्रकार घडला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे तो आणि त्याचा मुलगा वेळेत गाडीतून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, काही क्षणांतच संपूर्ण कार जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, देसाईगंज येथील रहिवासी अनिल डोंगरवार हे १८ एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आपल्या कारने (एमएच ३३ व्ही-४४०३) मुलाला सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेसाठी गडचिरोली येथे घेऊन जात होते. चुरमुरा गाव ओलांडल्यानंतर अचानक कारच्या बोनटमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डोंगरवार यांनी तत्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि क्षणाचाही विलंब न लावता मुलासह बाहेर पडले. ते बाहेर येताच आगीने अचानक रौद्र रूप धारण केले आणि काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

आगीच्या भीषण ज्वाळांमुळे गडचिरोली मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस वसीम पठाण तसेच होमगार्ड मोरेश्वर मेश्राम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान, आरमोरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत कार पूर्णतः जळून खाक झाली होती आणि केवळ लोखंडी सांगाडाच शिल्लक राहिला होता.

प्राथमिक अंदाजानुसार, वाहनातील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. ऐन परीक्षेच्या दिवशी हा प्रसंग ओढवल्याने डोंगरवार कुटुंबीय हादरले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here