Home ब्रेकिंग न्यूज वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर...

वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर तरुण शुभम रामटेकेचा बुडून अंत…

0
1603

 

गडचिरोली, दि. — होळीच्या आनंदमयी सणाला दुःखाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. आरमोरी येथील गायकवाड चौक परिसरातील २५ वर्षीय शुभम नामदेव रामटेके याचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रंगोत्सव साजरा केल्यानंतर मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या शुभमचा गांगलवाडी टी-पॉईंटजवळ पाण्यात बुडून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास शुभम आपल्या मित्रांसोबत वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेला होता. रंग खेळल्यानंतर सर्वजण नदीकाठी गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम खोल पाण्यात गेला आणि काही क्षणातच तो बुडाला. मित्रांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले; परंतु वैद्यकीय तपासणीत त्याला मृत घोषित करण्यात आले.

शुभम हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला एक बहिण आहे. वडील कबाड व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही त्यांनी मोठ्या कष्टाने शुभमला शिक्षण दिले आणि त्याला इंजिनिअर बनवले. दोन महिन्यांपूर्वीच त्याला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. घरची परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या कष्टाळू तरुणाच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

आनंदाच्या रंगांनी नटलेल्या होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे आरमोरी शहर हळहळ व्यक्त करत आहे. एका क्षणाच्या बेसावधपणामुळे आनंदाच्या रंगात दुःखाचा काळा रंग मिसळला गेला. रामटेके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक व मित्रपरिवारात शोकसागर पसरला आहे.

या घटनेमुळे नदीकाठी होणाऱ्या बेफिकीर आंघोळीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने नदी परिसरात सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here