Home ब्रेकिंग न्यूज कारगिल चौकात भीषण अपघात; मनमिळावू नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांचा दुर्दैवी मृत्यू…

कारगिल चौकात भीषण अपघात; मनमिळावू नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांचा दुर्दैवी मृत्यू…

0
4410

गडचिरोली, दि. 27 फेब्रुवारी (रात्री) : शहरातील कारगिल चौक परिसरात आज रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात गडचिरोलीचे नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे हे डॉ. देवराव होळी यांच्या स्वागत समारंभानंतर दुचाकीने आपल्या घरी परतत होते. कारगिल चौक परिसरात अचानक एक डुक्कर त्यांच्या गाडीसमोर आल्याने त्यांनी वाहनावरील ताबा गमावला आणि दुचाकी घसरून ते जोरात रस्त्यावर आपटले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गालगत जनावरे मोकाट फिरत असल्याची समस्या गंभीर बनली असून, त्याचाच परिणाम म्हणून हा अपघात घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत काटवे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; मात्र डोक्याला झालेल्या गंभीर मारामुळे व अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय महामार्गावर व शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असल्याबाबत प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही नागरिकांनी वराहपालन करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
मुक्तेश्वर काटवे हे गडचिरोली शहरात मनमिळावू, लोकांशी जिव्हाळ्याने वागणारे आणि नागरिकांच्या अडचणींना तत्परतेने धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहिली जात आहे. प्रशासनाने मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here