कुरखेडा, दि. 27 फेब्रुवारी – ऑनलाईन 7/12 (सातबारा उतारा) सही-शिक्क्यासह देण्यासाठी 500 रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव (साजा) येथील महिला तलाठी सुलोचना विठ्ठलराव कन्नाके (वय 38) यांना 26 फेब्रुवारी 2026 रोजी Anti Corruption Bureau Maharashtra (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) यांनी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
वनपट्याच्या जमिनीच्या सातबारासाठी मागितली लाच…
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याने आपल्या नावावरील वनपट्ट्याच्या शेतजमिनीचा सातबारा ऑनलाईन करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर ग्राम महसूल कार्यालय, गोठणगाव येथे सही-शिक्क्यासह सातबाऱ्याची प्रमाणित प्रत मागितली असता तलाठी कन्नाके यांनी त्यासाठी 500 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच देण्यास नकार देत संबंधित शेतकऱ्याने तात्काळ Anti Corruption Bureau Maharashtra, गडचिरोली कार्यालयात तक्रार नोंदविली.
तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक विकांत सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 फेब्रुवारी 2026 रोजी पंचांच्या उपस्थितीत गोपनीय पडताळणी करण्यात आली. पडताळणीत तलाठी कन्नाके यांनी 500 रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले तसेच 26 फेब्रुवारी रोजी रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर एसीबीने नियोजनपूर्वक सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी तलाठी यांनी आपल्या राहत्या घरी 500 रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
अटक केल्यानंतर आरोपीविरुद्ध Kurkheda Police Station येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, शासकीय कार्यालयांतील लाचलुचपत प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनीही एसीबीच्या या धाडसी कारवाईचे स्वागत केले आहे.




