Home सामाजिक पोर्ला येथील Bank of Maharashtra शाखेविरोधात संताप; कोमातील महिलेचा बँकेसमोर आणल्यानंतरही मदत...

पोर्ला येथील Bank of Maharashtra शाखेविरोधात संताप; कोमातील महिलेचा बँकेसमोर आणल्यानंतरही मदत न केल्याचा आरोप…

0
670

ग्रामसभेने घेतला बँक अधिकाऱ्याच्या बदलीचा ठराव…

गडचिरोली, ता. 27 फेब्रुवारी 2026 : पोर्ला येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या कामकाजाविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, एका कोमातील महिलेच्या प्रकरणामुळे हा संताप उफाळून आला आहे.

काटली येथील रहिवासी शांताबाई मानकर या 25 फेब्रुवारी 2026 रोजी अचानक कोमात गेल्यामुळे त्या स्वतः बँकेत जाऊ शकल्या नाहीत. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैशांची गरज असल्याने त्यांच्या मुलगी व जावयाने शांताबाईंच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पोर्ला येथील शाखेत पैसे काढण्यासाठी विनंती केली.

मात्र, “खातेधारक स्वतः हजर करा” असे सांगत शाखा व्यवस्थापकांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संबंधितांनी परिस्थितीची गंभीरता समजावून सांगूनही कोणताही पर्यायी मार्ग सुचविण्यात आला नाही. “आजारी व्यक्ती कोमात आहे, हे सांगूनही कोणतीही सहानुभूती दाखवली गेली नाही,” अशी खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली.

कोमातील अवस्थेतच खातेधारकाला बँकेसमोर आणले…

शेवटी नाईलाजाने कुटुंबीयांनी भाड्याने वाहन करून शांताबाईंना कोमातील अवस्थेतच बँकेसमोर आणले. मात्र एवढ्या गंभीर परिस्थितीतही बँकेकडून एकही कर्मचारी गाडीपाशी जाऊन चौकशी करण्यासाठी पुढे आला नाही, असा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, “सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पोर्ला ग्रामसभेत शाखा व्यवस्थापक कुळमेथे व उपशाखा व्यवस्थापक यांच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी तसेच त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामसभेतून करण्यात आली आहे.

गावातील तसेच परिसरातील अनेक खातेधारकांनी असभ्य वागणूक, आवश्यक माहिती न देणे, तसेच कामात टाळाटाळ केल्याच्या तक्रारी केल्या आहेत. वारंवार नाराजी व्यक्त करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here