गडचिरोली, दि. २१ : मद्यधुंद अवस्थेतील भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला मागून दिलेल्या जबर धडकेत दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही भीषण घटना आज संध्याकाळी सुमारे सव्वापाच वाजताच्या सुमारास कोरचीपासून दोन किलोमीटर अंतरावरील मोहगाव फाट्याजवळ घडली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह पसार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
या अपघातात सागर कल्लो (१९), रा. झेंडेपार, ता. कोरची आणि कैलास कोवे (३५), रा. मोहगाव, ता. कुरखेडा यांचा मृत्यू झाला. तर राजेश गंगबोईर (२८), रा. चमरोटोला, ता. मोहल्ला (छत्तीसगड), पुरुषोत्तम मडकाम (५१), रा. चिचोली, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच प्रदीप नैताम हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बंधाऱ्याच्या कामावरील मजुरांवर ओढवला मृत्यू…
जलसंधारण विभागाच्या वतीने झेंडेपार गावाजवळ बंधाऱ्याचे काम सुरू असून या कामासाठी चांदोना येथून सेंट्रींग साहित्य घेऊन एमएच ४०-बी ९५७३ क्रमांकाचा ट्रॅक्टर मोहगाव फाट्याकडे जात होता. दरम्यान हैदराबाद येथून कोरचीमार्गे रायपूरकडे जाणाऱ्या सीजी ०७-बीए ९२८४ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टर उलटून चार मजूर त्याखाली दबले गेले, तर एक मजूर दूर फेकला गेला. ट्रॅक्टरचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. सागर कल्लो यांचा जागीच मृत्यू झाला, तर कैलास कोवे यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.
पोलिस व नागरिकांची तातडीची मदत…
घटनेची माहिती मिळताच मोहगाव येथील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. तसेच बेळगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दिनेश खटोले, कोरचीचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलविले.
कोरची ग्रामीण रुग्णालयात डॉ. चेतना सिडाम आणि डॉ. शिव पुंडे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. मात्र, कोरची येथील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी चंद्रपूर येथे गेल्याने कुरखेडा येथून रुग्णवाहिका बोलावून जखमींना गडचिरोली येथे हलविण्यात आले.
अपघातानंतर ट्रकचालक अभिषेक शर्मा हा मद्यधुंद अवस्थेत ट्रकसह घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून पाठलाग केला आणि संबंधित ट्रक अडवून चालकाला ताब्यात घेतले.
अवैध दारू विक्रीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले…
दरम्यान, डोंगरगाव फाट्याजवळ सर्रास अवैध दारू विक्री होत असल्याने अनेक ट्रकचालक तेथे थांबून मद्यप्राशन करतात आणि पुढे प्रवास करतात. त्यामुळे बेळगाव घाट परिसरात वारंवार अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. आजचा अपघातही मद्यधुंद चालकामुळे झाल्याने संताप व्यक्त होत असून अवैध दारू विक्रीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणी कोरची पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.




