अगरबत्ती प्रकल्पाची CBI, ED किंवा SIT मार्फत चौकशी करा; नगरसेवक आशिष पिपरे यांची मागणी…
गडचिरोली : मेक इन गडचिरोली अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पासह संपूर्ण प्रकरणाची CBI, ED किंवा स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक आशिष अरुण पिपरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची व त्यांच्या पत्नीची बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधितांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीसही पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरसेवक पिपरे यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात मेक इन गडचिरोली या उपक्रमांतर्गत माजी आमदारांच्या पुढाकारातून जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग, Bank of India, Bank of Maharashtra आदी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग यात्रा आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अगरबत्ती उद्योगासाठी अर्ज स्वीकारण्यात आले होते.
यावेळी त्यांच्या पत्नी सोनाली पिपरे, आई मायाताई पिपरे आणि भावाची पत्नी उषा पिपरे यांनीही अगरबत्ती उद्योगासाठी अर्ज केला होता. त्यांच्या प्रभागात अधिकाऱ्यांनी महिलांना उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३५ टक्के अनुदानावर महिलांनी उद्योग सुरू करण्यास पुढाकार घेतला.
पिपरे यांनी सांगितले की, महिलांना एकत्रित सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी स्वतःच्या मालकीची जागा केवळ एक रुपया प्रति किलो कमिशनवर उपलब्ध करून दिली. दरम्यान, मशीन खरेदी प्रक्रियेत काही मशीनचे दर बाजारभावापेक्षा जास्त दाखविण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र त्यानंतर महिलांनी स्वतः ऑनलाईन पडताळणी करून सुमारे ९० हजार रुपये दराने मशीन खरेदी केल्या. गेल्या तीन वर्षांत या मशीनवर मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असून मशीन अद्याप सुस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व महिलांनी स्टॅम्प पेपरवर सुविधा मिळाल्याचे लेखी हमीपत्र दिल्याचा दावाही त्यांनी केला.
मात्र, काही राजकीय विरोधकांकडून हेतुपुरस्सर या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करून बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करून स्वतःची सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून दिवाणी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरोना महामारीनंतर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला. बँकेकडून खेळते भांडवल मंजूर न झाल्याने आणि कच्चा मालासाठी मदत न मिळाल्याने प्रकल्प अडचणीत आला, असे त्यांनी सांगितले. काही महिलांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या विरोधात कट रचण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
राजकीय हेतूने आणि आगामी नगरपंचायत निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांकडून हा प्रकार घडवून आणला जात असल्याचा आरोप करत, “मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी सर्व पुरावे प्रशासनाकडे सादर केले आहेत,” असे पिपरे यांनी स्पष्ट केले.
तसेच या प्रकरणात सत्य बाहेर येईल आणि दोषींवर कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त करत सर्व विरोधकांना कायदेशीर मार्गाने जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.




