नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा अभाव; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
गडचिरोली : शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालल्याचे चित्र समोर येत असून, वाहतूक विभागात तब्बल २६ हून अधिक कर्मचारी आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी कार्यरत असतानाही शहरातील चारही प्रमुख महामार्ग आणि मुख्य चौकांमध्ये वाहतुकीचे अक्षरशः तीन तेरा वाजल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शहराच्या सीमेपर्यंत वाहतुकीचे नियमन करण्याची जबाबदारी वाहतूक विभागावर असताना देखील अनेक ठिकाणी दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, कर्कश हॉर्नचा वापर, भरधाव वेगाने वाहन चालवणे, फटाके वाजणारे सायलेन्सर लावणे, चारचाकी वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावणे तसेच वाहन चालवताना सर्रास मोबाईलचा वापर करणे यासारख्या नियमभंगाच्या घटना उघडपणे सुरू आहेत. मात्र, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी असतानाही संबंधित वाहतूक प्रभारी अधिकारी शहरातील रस्त्यावर किंवा चौकांमध्ये क्वचितच दिसून येतात. त्यामुळे “कार्यालयात बसूनच वाहतूक नियंत्रण होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, शहरातील वाहतूक विभागाचे नियंत्रण स्थानिक पोलीस ठाण्याऐवजी उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली असल्याची माहिती समोर आली. मात्र, या नियंत्रण व्यवस्थेत समन्वयाचा अभाव असल्याने कर्मचारी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडताना दिसत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
काही ठिकाणी तर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असलेले कर्मचारी आपल्या नियुक्त पॉईंटवर न थांबता जवळील चहाच्या टपऱ्या, पानठेले किंवा दुकानांवर बसून वेळ घालवत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
जर वाहतूक प्रभारी अधिकारी स्वतःच मैदानात उतरून परिस्थितीचा आढावा घेत नसतील, तर उर्वरित कर्मचाऱ्यांकडून प्रभावी कामाची अपेक्षा कशी करावी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल, तर इतर बेकायदेशीर वाहनांवर नियंत्रण कसे ठेवले जाणार, अशीही विचारणा होत आहे.
दरम्यान, स्थानिक पोलीस निरीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देऊन वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
वाहतूक प्रभारी अधिकाऱ्यांनी नियमितपणे शहरातील चौक आणि संवेदनशील ठिकाणांना भेट देऊन कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवली, तर नियमभंग करणाऱ्यांवर निश्चितच अंकुश बसेल आणि शहरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा शिस्तीत येईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.




