Home सामाजिक गडचिरोलीत ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम; अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वतः ऐकणार महिलांच्या...

गडचिरोलीत ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम; अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वतः ऐकणार महिलांच्या तक्रारी…

0
293

 

गडचिरोली, दि. १६ फेब्रुवारी २०२६ : जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच न्याय मिळावा आणि तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी गडचिरोली येथे जिल्हास्तरीय जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनावणीत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वतः उपस्थित राहून महिलांच्या तक्रारींची थेट सुनावणी करणार आहेत.

ही जनसुनावणी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता होणार असून, जिल्ह्यातील महिलांनी कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता पुढाकार घेत आपल्या तक्रारी आयोगासमोर मांडाव्यात, असे आवाहन अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी केले आहे.

महिलांना जिल्ह्यातच न्याय देण्याचा आयोगाचा प्रयत्न…

राज्याच्या दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक महिलांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी मुंबई येथील महिला आयोग कार्यालयात जाणे आर्थिक, सामाजिक व अन्य कारणांमुळे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन महिला आयोगाने ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आयोग स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महिलांच्या समस्या ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न करत आहे.

या जनसुनावणी दरम्यान पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, तसेच जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महिलांच्या तक्रारींवर त्याच ठिकाणी प्राथमिक कार्यवाही करून त्यांना त्वरित दिलासा देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

महिला व बालकांच्या प्रश्नांवर होणार आढावा बैठक…

जनसुनावणीनंतर जिल्ह्यातील महिला व बालकांशी संबंधित विविध प्रश्नांच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत प्रशासन, पोलीस, कामगार, परिवहन, आरोग्य आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून, महिलांच्या समस्या, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि आवश्यक उपाययोजनांबाबत निर्देश दिले जाणार आहेत.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोग कटिबद्ध – रुपाली चाकणकर.

याबाबत बोलताना अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोग हा राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना त्यांच्या जिल्ह्यातच न्याय मिळण्याची सुविधा उपलब्ध होत आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, या उपक्रमामुळे महिलांना आपली कैफियत मांडण्याचे व्यासपीठ मिळत असून, त्यांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यास मदत होत आहे. तसेच प्रशासनालाही महिलांच्या स्थानिक समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यास मदत होत आहे.

या जनसुनावणीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना न्याय मिळविण्यासाठी मोठा दिलासा मिळणार असून, जिल्ह्यातील महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here