Home गडचिरोली गडचिरोली शहरात वाहतूक नियमभंगाविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई; दोन महिन्यांत १२ लाखांहून अधिक...

गडचिरोली शहरात वाहतूक नियमभंगाविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई; दोन महिन्यांत १२ लाखांहून अधिक दंड वसूल…

0
270

 

गडचिरोली | प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस वाहतूक विभागाच्या वतीने जानेवारी व फेब्रुवारी २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच प्रलंबित चलान वसुलीबाबत व्यापक कारवाई करण्यात आली असून, या सर्व कारवायांमधून एकूण १२ लाख ४४ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची संपूर्ण माहिती गडचिरोली पोलीस वाहतूक विभागाने प्रसिद्ध केली आहे.

वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर एकूण २३० प्रकरणे नोंदविण्यात आली. या कारवाईतून २ लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ट्रिपल सीटमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने अशा वाहनचालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

तसेच, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर (ड्रंक अँड ड्राईव्ह) ७९ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणे हे स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असल्याने अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

दरम्यान, वाहतूक विभागाने प्रलंबित चलान वसुलीसाठीही विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान १ हजार ६०५ प्रलंबित चलानांमधून तब्बल १० लाख २१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघाली असून शासनाच्या महसुलात मोठी भर पडली आहे.

गडचिरोली पोलीस वाहतूक विभागाच्या या धडक कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. तसेच, शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी ही मोहीम प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाहतूक विभागाने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, हेल्मेटचा वापर करणे, ट्रिपल सीट प्रवास टाळणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविणे तसेच प्रलंबित चलान तत्काळ भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here