Home राजकीय गडचिरोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची मागणी; नगराध्यक्षा प्रणोतीताई निंबोरकर यांना निवेदन…

गडचिरोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची मागणी; नगराध्यक्षा प्रणोतीताई निंबोरकर यांना निवेदन…

0
543

 

चंद्रपूर रस्त्यावरील चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी १ कोटी निधीची मागणी; तरुणांचा भावनिक आग्रह…

गडचिरोली :

गडचिरोली शहरातील युवकांना प्रेरणा, स्फूर्ती आणि राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी शहरातील तरुण वर्गाकडून होत आहे. यासंदर्भात टायगर ग्रुप गडचिरोलीच्या वतीने नगराध्यक्षा मा. सौ. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे.

शहरातील चंद्रपूर रस्त्यावरील महिला महाविद्यालयाकडे जाणाऱ्या प्रमुख चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा, अशी नागरिक व युवकांची दीर्घकालीन मागणी असून, या चौकाचे सुयोग्य सौंदर्यीकरण झाल्यास शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या ठिकाणी उभारण्यात येणारा शिवाजी महाराजांचा पुतळा युवकांसाठी उर्जास्त्रोत ठरेल, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवांना चालना देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

टायगर ग्रुपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, नगर विकास विभागामार्फत सदर चौकासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात आल्यास तसेच चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आल्यास, संघटनेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येईल. यासाठी नगर विकास विभागाच्या विविध योजनांतून सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात यावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या मागणीमुळे गडचिरोली शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून, शहराला एक ऐतिहासिक व प्रेरणादायी ओळख मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता नगर परिषद व नगर विकास विभाग या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

निवेदनावर टायगर ग्रुप गडचिरोलीचे अध्यक्ष तथा युवासेना जिल्हाध्यक्ष (शिंदे शिवसेना) दीपक भारसाकडे यांची स्वाक्षरी असून, शहरातील विविध स्तरातून या मागणीला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here