केमिस्ट भवनाजवळील फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीचे आदेश; स्वच्छता, व घंटागाडीबाबत अधिकाऱ्यांना कडक सूचना…
गडचिरोली :
गडचिरोली नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये केमिस्ट भवनाजवळील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन गेल्या अनेक दिवसांपासून फुटलेल्या अवस्थेत होती. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नव्हती. अखेर नागरिकांनी ही गंभीर समस्या नगरसेविका मेघा वरगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
नगरसेविका मेघा वरगंटीवार यांनी घटनास्थळीच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून सदर पाईपलाईन त्वरित दुरुस्त करण्याचे स्पष्ट आदेश दिले. तसेच प्रभागातील इतर मूलभूत समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रभागातील नाल्या अनेक दिवसांपासून साफ न झाल्याने दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. यासह रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांची तातडीने सफाई करण्याचे तसेच कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडी नियमितपणे सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
या वेळी स्वच्छता विभाग व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय नगरसेवक सागर निंबोरकर, सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत मोटघरे व मोहन वरगंटीवार यांचीही उपस्थिती होती.
दरम्यान, नगराध्यक्षांचे यजमान तसेच स्वीकृत सदस्य सागर निंबोरकर यांनीही नगर पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे बोलावून वॉर्डातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आणि नियमित तपासणी करून तात्काळ कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
नगरसेविका मेघा वरगंटीवार यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाने आता या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




