Home राजकीय गडचिरोली काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र;स्वीकृत सदस्य नियुक्तीत झालेल्या अन्यायाने आता शहराध्यक्ष बदलविण्याच्या...

गडचिरोली काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र;स्वीकृत सदस्य नियुक्तीत झालेल्या अन्यायाने आता शहराध्यक्ष बदलविण्याच्या हालचालींना वेग…

0
907

 

गडचिरोली :

गडचिरोली शहर काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडींना सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. नगरपालिकेच्या अलीकडील निवडणुकीत काँग्रेसने सहा नगरसेवक निवडून आणत मागील निवडणुकीच्या तुलनेत आपली स्थिती सुधारल्याचे चित्र होते. मात्र, त्यानंतर घेतलेल्या काही निर्णयांमुळे काँग्रेस पक्षातच तीव्र नाराजी उसळली असून शहराध्यक्ष पदावरून हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

नगरपालिकेत विरोधी पक्षाला एक स्वीकृत सदस्य देण्याचा नियम असताना, सामाजिक कार्याचा अनुभव असलेला, एकनिष्ठ कार्यकर्ता किंवा समाजसेवक यांनाच हे पद द्यावे अशी पक्षातील अनेकांची अपेक्षा होती. मात्र, सर्वसंमती न घेता काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या मर्जीतल्या माजी नगरसेवकाला स्वीकृत सदस्य पद देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

या एकतर्फी निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, शहर नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. “सर्वसंमतीने निर्णय घ्यायला हवा होता. शहरात सामाजिक कार्याचा मोठा अनुभव असलेले अनेक चेहरे असताना केवळ मर्जीतल्या व्यक्तीला पद देणे हे पक्षासाठी घातक आहे,” अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, गडचिरोली नगरपालिकेत सत्ता आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या घराण्यातील नेत्याला काँग्रेसमध्ये प्रवेश देत, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, संबंधित उमेदवाराकडे निवडणुकीचे ठोस नियोजन नसल्याने आणि ‘परिवर्तन पॅनल’कडून मतांची विभागणी झाल्याने काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले. तरीही मागील वेळी एका नगरसेवकावर समाधान मानणाऱ्या काँग्रेसला यावेळी सहा नगरसेवक निवडून आणता आले, हे पक्षासाठी दिलासादायक ठरले.

आता तरी पक्षाची कार्यपद्धती सुधारेल, स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी अपेक्षा एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, स्वीकृत सदस्य पदाच्या वादामुळे जिल्हा नेतृत्व, शहराध्यक्ष आणि पक्षातील मोठ्या नेत्यांविरोधात रोष वाढत आहे.

नाराज कार्यकर्त्यांनी आपली व्यथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच वरिष्ठ नेत्यांकडे मांडली असून, “यापुढे एकनिष्ठ कार्यकर्त्यांना योग्य मान-सन्मान दिला जाईल,” असे आश्वासन ‘भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका वरिष्ठ नेत्याने दिल्याची माहिती आहे.

सहा नगरसेवकांच्या बळावर काँग्रेस पक्ष गडचिरोली शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेईल का, की अंतर्गत वादातच अडकून राहील, याकडे आता कार्यकर्ते आणि नागरिक दोघांचेही लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here