Home ब्रेकिंग न्यूज भाजप कोर कमिटीत तुफान… आमदार विरुद्ध पदाधिकारी… गडचिरोली भाजपातील अंतर्गत संघर्ष उघड…

भाजप कोर कमिटीत तुफान… आमदार विरुद्ध पदाधिकारी… गडचिरोली भाजपातील अंतर्गत संघर्ष उघड…

0
355

गडचिरोलीत भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाला;

कोअर कमिटी बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा, पदाधिकाऱ्यावर धावून जात हात उगारल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप…

गडचिरोली : नगर परिषद निवडणूक आणि त्यानंतरच्या सत्तासमीकरणांमुळे भारतीय जनता पक्षात निर्माण झालेला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. आमदार आणि निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमधील वर्चस्वाच्या संघर्षाने सोमवारी सायंकाळी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत गंभीर वळण घेतले. या बैठकीत आमदारांनी विनाकारण वाद घालत संबंधित पदाधिकाऱ्यावर धावून जात हात उगारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत असून, त्यामुळे काही काळ वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते.

सोमवारी सायंकाळी आयोजित कोअर कमिटीच्या बैठकीत नगर परिषद निवडणुकीनंतरच्या घडामोडींवर चर्चा सुरू असताना आमदारांनी निर्णय प्रक्रियेत आपल्याला विश्वासात न घेता डावलले जात असल्याची तक्रार मांडली. यावर संबंधित पदाधिकाऱ्याने आपल्याला देण्यात आलेल्या अधिकारांनुसारच निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र यावेळी आमदारांनी आक्रमक भूमिका घेत विनाकारण वाद घातला आणि त्या पदाधिकाऱ्यावर धावून जात हात उगारल्याचा प्रयत्न केल्याचे बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार पाहून उपस्थित सर्वच पदाधिकारी हादरले.

या घटनेनंतर नाराज पदाधिकाऱ्याने आमदारांवर जोरदार शब्दांत टीका केली.

“आमदारांनी आधी आपली आमदारकी पाहावी. आपल्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यावर लक्ष केंद्रित करावे. पक्षाच्या संघटनात्मक कामात कुठेही दखल देऊ नये. ज्यांनी त्यांना निवडून आणले आहे, त्या कार्यकर्त्यांना राजकारण शिकविण्याचा प्रयत्न करू नये,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

नगर परिषद निवडणुकीतील अपयशासाठीही आमदारांनाच जबाबदार धरत त्यांनी आरोप केला की, “आमदारांच्या हट्ट आणि जिद्दीमुळे चुकीचे उमेदवार देण्यात आले. परिणामी जवळपास पाच उमेदवारांचा पराभव झाला असून नगर पालिकेत भाजपला केवळ निसटते विजय मिळाले आहेत.”

आमदारांवर आणखी गंभीर आरोप करताना ते म्हणाले की, “संपूर्ण भाजपची जिल्हा कार्यकारिणी आमदारांच्या स्वतःच्या कार्यालयातूनच चालते, असा त्यांचा समज झालेला आहे. पहिल्यांदाच आमदारकी मिळाल्यानंतर लोकांच्या प्रत्यक्ष अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा. स्थानिक पातळीवर सोडवता येणाऱ्या समस्या थेट विधानभवनात मांडून लोकांची दिशाभूल करणे आणि समस्या सुटतील अशा भूलथापा देणे तातडीने थांबवावे.”

दरम्यान, या अंतर्गत संघर्षामागे नगर पालिका सत्तास्थापनेतील राजकारणही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. नगर परिषद निवडणुकीत आमदारांच्या मर्जीतले काही उमेदवार निवडून न आल्याने तसेच त्यांचा पराजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून झाल्याने आमदारांनी आता नगर पालिकेच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसला समाविष्ट करायचे नाही, अशी जिद्द धरल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे महायुतीचे नेते बंटी भांगडिया यांनी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व महायुतीच्या उमेदवारांना घेऊन सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता या घोषणेलाही आमदारांनी विरोध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात ठेवणे भाजपला सत्तेच्या दृष्टीने परवडणारे नसताना, आमदारांचा हा विरोध म्हणजे पक्षाच्या अधिकृत निर्णयालाच विरोध आहे काय, असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित न राहता थेट सत्तासमीकरणांवर परिणाम करणारे ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसताच काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने मध्यस्थी करत दोघांनाही वेगळे केले. अखेर संबंधित पदाधिकाऱ्याला बैठकीतून निघून घरी जाण्यास सांगण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पहिल्यांदाच असा गंभीर प्रकार घडल्याने पक्षाच्या गोटात खळबळ उडाली असून, गडचिरोलीतील भाजपमधील अंतर्गत कलह उघड झाला आहे.

या घटनेनंतर पक्ष नेतृत्व नेमकी कोणती भूमिका घेते आणि या वाढत्या अंतर्गत संघर्षावर कसा तोडगा काढला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here