Home ब्रेकिंग न्यूज भरधाव लोहखनिज ट्रकचा टेम्पोला जोरदार धडक; चालकाचा अपघातानंतर पलायन संतप्त ग्रामस्थांचा...

भरधाव लोहखनिज ट्रकचा टेम्पोला जोरदार धडक; चालकाचा अपघातानंतर पलायन संतप्त ग्रामस्थांचा पाठलाग, डोंगरगावात ट्रक पकडला…

0
945

खनीज वाहतूक बनली यमलोकाचे द्वार…सर्व सामान्य माणसांचे जीवन स्वस्त झाले…

 

 

गडचिरोली, दि. १५ :

गडचिरोलीजवळील येवली परिसरात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने ‘टाटा एस’ टेम्पोला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. मात्र अपघातानंतर मदत करण्याऐवजी ट्रकचालकाने घटनास्थळावर न थांबता ट्रकसह पलायन केले. ही घटना बुधवारी (दि. १५ जानेवारी) रोजी घडली. या अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोलीकडून येणारा ‘टाटा एस’ टेम्पो (क्रमांक एमएच ३३ टी ४९६१) येवली परिसरात असताना समोरून येणाऱ्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने (क्रमांक सीजी ०८ एएस ५२२२) त्याला जोरदार धडक दिली. धडकेमुळे टेम्पो रस्त्याच्या कडेला फेकला गेला. या अपघातात टेम्पोचालक राजू सोनटक्के हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळी थांबण्याऐवजी भरधाव वेगाने पळ काढला. घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तत्काळ पाठलाग करत डोंगरगाव परिसरात संबंधित ट्रक अडवला. मात्र तोपर्यंत ट्रकचालकाने ट्रक रस्त्यावरच सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, येवली–डोंगरगाव मार्गावर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. यापूर्वीही या मार्गावर गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र वारंवार अपघात होऊनही संबंधित खाण कंपन्यांवर आणि वाहतूकदारांवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

“भरधाव आणि बेदरकार लोहखनिज वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले असून प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. लोकांचे जीवन स्वस्त झाले आहे का?” असा सवाल प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या अपघातामुळे पुन्हा एकदा लोहखनिज वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वेगमर्यादा, रात्रीची वाहतूक बंदी, सीसीटीव्ही व नियमित तपासणीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here