रोगनिदान व सार्वजनिक आरोग्य देखरेख अधिक सक्षम; दुर्गम भागांतील नागरिकांना मिळणार दर्जेदार तपासणी सुविधा…
गडचिरोली, दि. 9 जानेवारी 2026 :
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे नवनिर्मित एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे (इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी) गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट होणार असून रोगनिदान, आजारांची सातत्यपूर्ण देखरेख आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मोठी चालना मिळणार आहे.
या प्रयोगशाळेमध्ये संसर्गजन्य आजारांची तपासणी, पाणी व अन्ननमुने विश्लेषण, पर्यावरणीय नमुन्यांची चाचणी तसेच विविध जैविक तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजारांचे वेळेत व अचूक निदान शक्य होणार असून उपचार तात्काळ सुरू करता येणार आहेत. संभाव्य साथरोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे यांनी ही एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाची पायरी असल्याचे नमूद केले. या सुविधेमुळे ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांनाही विश्वासार्ह, अचूक आणि दर्जेदार तपासणी सेवा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोलीचे अधिष्ठाता अविनाश टेकाडे आणि वरिष्ठ प्राध्यापक नितीन टिपले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासोबतच सामान्य रुग्णालयातील सचिन करंजेकर, मुकुंद ढबाले यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय प्राध्यापक, सहाय्यक व सहयोगी प्राध्यापक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा कर्मचारी तसेच अन्य आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत या प्रयोगशाळेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, जलद आणि लोकाभिमुख होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.




