एटापल्ली :
एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत दोन वेळा चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस एटापल्ली पोलिसांनी अटक करून हे गंभीर प्रकरण उघडकीस आणले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री एका अज्ञात आरोपीने एटापल्ली येथील स्टेट बँक शाखेत खिडकीतून प्रवेश केला. कटरच्या सहाय्याने बँकेतील लॉकर व एटीएम मशीन फोडून रोकड चोरी करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र लॉकर व एटीएम मशीन फोडण्यात अपयश आल्याने चोरी होऊ शकली नाही. या प्रकरणी एटापल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 161/2025 अन्वये संबंधित कलमानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
7 जानेवारीला पुन्हा चोरीचा प्रयत्न केला होता…
या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री आरोपीने पुन्हा एकदा त्याच स्टेट बँक शाखेत प्रवेश करून पूर्वीच्या पद्धतीने लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. सलग दोन वेळा झालेल्या चोरीच्या प्रयत्नांमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि एटापल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपी बिभास ऊर्फ संजु बच्चु डे (वय 23 वर्षे, रा. पिव्ही-92, पाखांजूर, जिल्हा कांकेर, छत्तीसगड) याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
कसून चौकशीत आरोपीने दोन्ही वेळा चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. आरोपीच्या अटकेमुळे एटापल्लीतील स्टेट बँक शाखेत झालेल्या दोन्ही चोरीच्या प्रयत्नांचा पर्दाफाश झाला आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 12 जानेवारी 2026 पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एटापल्ली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक रोहिणी गिरवलकर करत आहेत.
या कारवाईमुळे बँक परिसरासह संपूर्ण एटापल्ली तालुक्यात पोलिसांच्या सतर्कतेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.




