Home ब्रेकिंग न्यूज नगरपालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर नर्सरी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू...

नगरपालिकेच्या शाळांतील शिक्षणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर नर्सरी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू करण्यासाठी ठराव मंजूर करून शासन मान्यतेची मागणी…

0
333

 

गडचिरोली :

गडचिरोली नगरपालिकेच्या अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून आठवीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे शहरातील अनेक गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आधार मिळत आहे. मात्र, नर्सरी, केजी-१ व केजी-२चे शिक्षण खासगी शाळांमध्ये प्रचंड महाग असल्याने गरीब कुटुंबांवर आर्थिक ओझे वाढत आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये नर्सरी, केजी-१ व केजी-२चे वर्ग तातडीने सुरू करून त्यांना शासनाची मान्यता द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

तसेच, नगरपालिकेच्या शाळांमध्ये आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नववी व दहावीचे वर्ग उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने महागड्या खासगी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागत आहे. यामुळे अनेक गरीब कुटुंबांवर शिक्षणाचा खर्च परवडणारा राहत नसून काही विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच थांबण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग तातडीने सुरू करावेत, अशी ठाम मागणी शहरातून होत आहे.

नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा या गरीब कुटुंबांसाठी शिक्षणाचा कणा मानल्या जातात. गडचिरोलीतील लहान मुला-बाळांना दर्जेदार, सलग व परवडणारे शिक्षण मिळावे, यासाठी प्रत्येक नगरपालिकेच्या शाळेत नर्सरीपासून दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत पालकवर्गातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, गडचिरोलीतील नेहरू शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून ती शहरातील नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. या यशामागे नेहरू शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांचे मोलाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचा अभ्यास करून शिक्षण सुरळीत सुरू राहावे, शिस्त व गुणवत्तेचा दर्जा कायम राहावा यासाठी त्यांनी वेळोवेळी स्वतः जबाबदारी घेत सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्याचमुळे नेहरू शाळेला आयएसओ मानांकनाचा सन्मान मिळाला, असे शिक्षण क्षेत्रातून बोलले जात आहे.

मात्र, इतर नगरपालिकेच्या शाळांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांची नेहरू शाळेतून बदली करून इतर नगरपालिकेच्या शाळांमध्ये नियुक्ती देत त्या शाळांचा दर्जा सुधारण्याची संधी नगरपालिकेने लक्ष्यरूपाने द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे. तसेच प्रत्येक शाळेत विकासाभिमुख, जबाबदार व कार्यक्षम मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्याची गरज व्यक्त होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, हल्लीच नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी आपली जबाबदारी ओळखून तातडीने पुढाकार घ्यावा, अशी स्पष्ट मागणी नागरिकांकडून होत आहे. नगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये नर्सरी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत नगरपरिषदेत तातडीने ठराव मंजूर करून शासनाची मान्यता मिळवण्यासाठी ठोस व जलद प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीही नगरपालिकेच्या शाळांमध्ये योग्य व्यक्तींची नियुक्ती करून नर्सरी, केजी-१, केजी-२ तसेच नववी-दहावीचे वर्ग सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. आता नव्या नगरपालिकेच्या नेतृत्वाकडून या महत्त्वाच्या शैक्षणिक प्रश्नावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here