Home ब्रेकिंग न्यूज मोठी बातमी | गडचिरोलीत आरटीओ चालानच्या नावाने सायबर फसवणूक एपीके फाईलमुळे शेकडो...

मोठी बातमी | गडचिरोलीत आरटीओ चालानच्या नावाने सायबर फसवणूक एपीके फाईलमुळे शेकडो नागरिकांचे WhatsApp हॅक, शहरात खळबळ…

0
722

गडचिरोली :
आरटीओ चालानच्या नावाखाली पाठविण्यात येणाऱ्या एपीके (APK) फाईलमुळे WhatsApp हॅक होत असल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली शहरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक ओळखीच्या व्यक्तींच्या WhatsApp नंबरवरून लिंक पाठवून केली जात असल्याने अनेक प्रतिष्ठित नागरिक याला बळी पडले आहेत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शहरात सायबर फसवणुकीचे प्रकार वाढल्याने सर्वसामान्य मोबाईलधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ओळखीच्या व्यक्तीच्या WhatsApp वरून आलेली फाईल आपल्याच माणसाने पाठवली असावी, या विश्वासातून अनेकांनी ती फाईल डाउनलोड केली. मात्र फाईल ओपन करताच क्षणात WhatsApp अकाउंट हॅक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.

हॅक होताच फसवणुकीचा साखळी प्रकार…

WhatsApp हॅक होताच संबंधित मोबाईल नंबरवरून त्या व्यक्तीच्या संपर्कातील सर्व ग्रुप व व्यक्तींना तीच फसवी एपीके फाईल आपोआप पाठवली जात आहे. परिणामी एकामागून एक शेकडो नागरिकांचे WhatsApp अकाउंट हॅक झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

महिलांनाही फटका…

धक्कादायक बाब म्हणजे अनेक महिलांना त्यांच्या घरातील सदस्यांकडून आलेल्या WhatsApp लिंकवरून आलेली फाईल डाउनलोड केल्यानंतर WhatsApp हॅक झाल्याचे प्रकार गडचिरोलीत घडल्याचे समोर आले आहे.

सायबर विभागाकडे झाल्या तक्रारी…
ज्यांचे WhatsApp हॅक झाले आहेत, त्यांनी पोलीस सायबर शाखेत तक्रारी दाखल केल्या असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सध्या तरी या प्रकारातून थेट बँक खात्यातील रक्कम लंपास झाल्याची घटना समोर आलेली नसली, तरी धोका नाकारता येत नाही.

पोलिसांचे आवाहन…
पोलीस विभागाकडून जिल्ह्यातील सर्व मोबाईलधारकांना अनोळखी किंवा संशयास्पद लिंक व एपीके फाईल डाउनलोड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. आरटीओ चालान, बँक नोटीस किंवा कोणत्याही शासकीय नावाखाली आलेल्या लिंकची खात्री केल्याशिवाय फाईल उघडू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सायबर हल्ल्यांचे वाढते प्रकार लक्षात घेता, टेलिकॉम कंपन्या व मोबाईल सेवा पुरवठादारांनी ग्राहकांच्या अकाउंट सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गडचिरोलीतील नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here