गडचिरोली :
हिवाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना जंगल व अतिदुर्गम भागातील नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी धानोरा तालुक्यातील जंगलखेडे मिचगाव (झाडा) येथे नविन व उबदार ब्लँकेट वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गरजू, वृद्ध, महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले.
जंगल व दुर्गम परिसरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना थंडीचा अधिक फटका बसत असल्याने हा उपक्रम अत्यंत वेळेवर व उपयुक्त ठरला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे प्रभावी दर्शन घडले.
या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसांत ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून, गावकऱ्यांनी या मानवतावादी कार्याचे मनापासून स्वागत करत लायन्स क्लब गडचिरोलीचे आभार मानले. विशेषतः जंगल परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी अशा प्रकारची मदत अत्यंत मोलाची असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक एकोपा, सहकार्य व सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो. भविष्यातही गरजू नागरिकांसाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या ब्लँकेट वाटप उपक्रमामुळे मिचगाव (झाडा) परिसरात मानवतावादी दृष्टिकोनातून एक आदर्श उदाहरण निर्माण झाले असून, सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे ग्रामीण व जंगल भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होत आहे.
या कार्यक्रमास लायन्स नारायण पद्मावार, लायन्स शेमदेव चाफले, लायन्स सुरेश लडके, लायन्स किशोर चिलमवार, लायन्स दीपक मोरे, लायन्स नितीन बट्टूवार, लायन्स चाफले मॅडम तसेच लायन्स सविता बट्टूवार यांची उपस्थिती होती.




