गडचिरोली :
गडचिरोली सामान्य रुग्णालयातील सुस्त, निष्क्रिय आणि वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत आलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांची तडकाफडकी बदली करून त्यांची महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या जागी वारंवार वादग्रस्त ठरलेल्या डॉ. वर्षा लहाडे यांची नियुक्ती केल्याने संपूर्ण आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वादग्रस्त कामकाजात सक्रिय सहभाग, गंभीर प्रकरणांतील सहभागाचे आरोप तसेच रागीट स्वभावामुळे ओळख असलेल्या डॉ. वर्षा लहाडे यांना महत्त्वाच्या पदावर बसवण्यात आल्याने गडचिरोलीतील नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “वादग्रस्त अधिकाऱ्यांऐवजी शिस्तबद्ध, जबाबदार आणि लोकाभिमुख अधिकाऱ्यांनाच पदोन्नतीवर नियुक्ती देण्यात यावी,” अशी ठाम मागणी आता जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेच्या महिला संघटक नेत्या श्रीमती छाया कुंभारे यांनी राज्य सरकारकडे स्पष्ट शब्दांत मागणी केली आहे की, गडचिरोलीतून बदली झालेले अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. सतीश कुमार सोलंकी यांनाच पदोन्नती देऊन पुन्हा मुख्य शल्यचिकित्सकपदी नियुक्त करण्यात यावे. मागील पाच वर्षांत सामान्य रुग्णालयाचा शिस्तबद्ध आणि सुरळीत कारभार प्रामुख्याने डॉ. सोलंकी यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळेच चालू होता, तसेच वरिष्ठ डॉक्टर डॉ.मनीष मेश्राम यांच्या देखरेखीखाली रुग्णालयातील कामकाज योग्यरीत्या पार पडत होते, असा दावा कुंभारे यांनी केला आहे.
तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके या केवळ फाइलांवर सह्या करणे व बैठकींना उपस्थित राहणे इतपतच मर्यादित राहिल्या. रुग्णालयातील तांत्रिक अडचणी, स्वच्छतेचे प्रश्न, पायाभूत सुविधांचा अभाव याकडे त्यांनी गंभीरपणे लक्ष दिले नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याउलट, तुलनेने कनिष्ठ पदावर असतानाही डॉ. सतीश सोलंकी यांनी शिस्तबद्ध प्रशासन, नम्र स्वभाव आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रुग्णसेवेला प्राधान्य दिले. कोणतेही आव्हान असो, ते प्रत्यक्ष मैदानात उतरून सोडवण्याची मानसिकता त्यांच्यात असल्याचे कर्मचारी व नागरिक सांगतात.
डॉ. सोलंकी यांच्या कार्यपद्धतीमुळे ते गडचिरोलीकरांच्या मनात घर करून बसले असून, “डॉ. सोलंकी” हे नावच आज विश्वासाचे प्रतीक बनले आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना तात्काळ पदोन्नती देऊन पुन्हा गडचिरोलीचे शल्यचिकित्सक म्हणून नियुक्त करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
गडचिरोली जिल्हा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालकत्व जिल्हा असताना, येथील समस्या वेळेत सुटल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेलाही धक्का बसू शकतो, अशी स्पष्ट भूमिका कुंभारे यांनी मांडली. सामान्य रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असताना, फुटलेल्या सांडपाणी पाईपलाईनमुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळच घाण साचलेली दिसत आहे. वर्षभरापासून ही समस्या कायम असूनही केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वारंवार मंत्र्यांच्या व सहपालकमंत्र्यांच्या बैठकीत ताशेरे ओढले जात असतानाही सुधारणा न झाल्यानेच डॉ. माधुरी किलनाके यांची बदली झाली. मात्र त्यांच्या जागी पुन्हा वादग्रस्त अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने सामान्य रुग्णालयाचा कारभार खरोखर सुधारेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“मुख्यमंत्र्यांच्या पालकत्व जिल्ह्यात प्रत्येक पदावर जबाबदार, शिस्तप्रिय आणि लोकहित जपणारे अधिकारीच बसले पाहिजेत,” अशी ठाम मागणी शिवसेना नेत्या श्रीमती छाया कुंभारे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या तक्रारी, अडचणी व समस्या तात्काळ सोडवण्यात आल्या नाहीत, तसेच स्वच्छता व तांत्रिक दुरुस्ती त्वरित करण्यात आली नाही, तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सामान्य रुग्णालय हे “रोगांचे माहेरघर” बनू नये, यासाठी तात्काळ दुरुस्ती, स्वच्छता आणि जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी आता गडचिरोली शहरातील नागरिकांकडून जोर धरताना दिसून येत आहे.




