रस्त्यावर उतरणारे व जेलभरो आंदोलन करणारे लोकप्रतिनिधींना या समस्या दिसत नाही काय..?
सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांचा सर्व लोकप्रतिनिधींना प्रश्न..!
अहेरी:- उपविभागातील अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी नागरिकांना कमी वेळेत जास्त पैसा कमविण्याची संधी म्हणजे तेंदुपत्ता तोडाईचा काम असते मात्र मागील 4 ते 5 वर्षांपासून तेंदुपत्त्याची थकीत रक्कम मजुरांना मिळाली नाही. याची सर्वस्वी जबाबदारी येथील स्थानिक व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनची असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मजुरांना थकीत रक्कम मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे तसेच वर्षानुवर्षे संपत असून आता अजून तेंदुपत्ता तोडण्याची संधी आली आहे मात्र तेंदुपत्ता मजुरांना थकीत रक्कम मिळाली नसल्याने त्यांच्या समोर काम करण्यात नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे शासन व प्रशासन त्यांच्या गंभीर समस्येची बाब सोडविण्यात यावी अशी मागणी उपविभागातील नागरिकांकडून होत आहे.
तेंदुपता रक्कम ज्या कंत्राटदारांनी थकीत ठेवली आहे त्यांची प्रशासनामार्फत चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना नवीन कुठल्याही जिल्ह्यात अथवा राज्यात सहभाग घेता येणार नाही याची दखल घ्यावी.
मागील 4 ते 5 वर्षांपासून तेंदुपत्याची थकीत रक्कम मजुरांना मिळाली नाही याची संपूर्ण जबाबदारी स्थानिक सह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आहे मात्र यांच्या निर्लज्ज गैरकारभारामुळे आदिवासी व गैरआदिवासी मजुरांना उपासमारीची वेळ आली आहे. यांची संपूर्ण जबाबदारी आजी व माजी लोकप्रतिनिधींची आहे.
फसवणूक करणाऱ्या तेंदु कंत्राटदारांना नवीन आर्थिक वर्षात कुठेही सहभाग घेता येणार नाही याची महसूल विभाग, पोलीस प्रशासन व वनविभाग यांनी लक्ष घालने आणि या फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांची व यांच्या हितचिंताकांच्या मालमत्तेची सिआईडी, सिबीआई, ईडी यांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी व यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे व तत्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावे जेणेकरून या जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील व राज्यातील सामान्य जनतेला फसवणूक करणार नाही. असे न केल्यास जिल्ह्यातील संपूर्ण अशिक्षित व सुशिक्षित जनता प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करणार.
रस्त्यावर उतरणारे व जेलभरो आंदोलन करणारे लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातील दक्षिण भागातील अनेक मोठे समस्या ज्वलंत असून याकडे लक्ष नाही मात्र सुर्जागड म्हटल की बरोबर आंदोलने तसेच निदर्शने करतात. याव्यतिरिक्त अहेरी उपविभागातील सामान्य जनतेला होणारा त्रास दिसत नाही काय..?
जसे आरोग्य, शिक्षण, रस्ते आलापल्ली-सिरोंचा, खमनचेरू-अहेरी, अहेरी-देवलमरी, सुभाषनगर-आलापल्ली, अहेरी ते चेरपल्ली पुल व राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता तसेच मृत्यूचा सापळा असलेला 353 सी राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 4 ते 5 वर्षात जवळपास 120 लोक मृत्यूमुखी पडले, 84 लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले व 174 लोकांना किरकोळ दुखापत झाली या सगळ्या समस्यांची जबाबदारी का बरं घेतले नाही…? असा आरोप आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संतोष ताटी कोंडावार यांनी केलेला आहे