कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुन्हा घ्या : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

0
419

 

गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक सत्तेचा दुरुपयोग करून जिंकल्याचा आरोप…

Gadchiroli district highlights.29/4/2023

गडचिरोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने सत्तेचा दुरुपयोग करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जिंकली असून आमच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे ही निवडणूक पुन्हा नव्याने घेतली जावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने केली आहे.

 

निवडणूक निकालानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारांना आरोप केला की, ३२ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज स्वतः किंवा सूचका मार्फत खरेदी केली नव्हती. यावर आक्षेप घेवूनही द्वेषभावनेतून सदर अर्ज वैध केले. मात्र तुकाराम गेडाम, देवेंद्र भोयर, निशा आयतुलवार यांनी शेतकरी असल्याचे दाखले सादर करुनही त्यांचे अर्ज अवैध केले. त्यामुळे अनेक अपात्र व्यक्ती निवडून आले. कोर्टात जावू नये म्हणून अपीलांचाही निकाल उशिरा दिला. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांची माहितीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लावली नव्हती. मतदान केंद्र आणि कोण कुठे मतदान करणार याची माहितीसुद्धा शेवटच्या दिवशी दिली. आणि आम्हाला प्रचार करण्यासाठी आडकाठी निर्माण केल्याचा आरोप उमेदवारांनी केला.

 

निवडणूकीच्या आदल्या दिवशीच्या रात्री चांदाळा येथील आश्रम शाळेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याची माहिती उघडकीस येवून आणि त्याबाबत पोलिसात तक्रार होवूनही कोणतीही कारवाई झाली नाही. अशी टीकाही यावेळी उमेदवारांनी केली.

 

मतमोजणी करतांना सेवा सहकारी गटातील तीन मतपेट्यांपैकी दोन मतपेट्यांच्या कुलूपांवर प्रतिनिधींच्या सह्यांचे कागद चिकटवलेले नव्हते. यावरुन मतपेटीचे कुलूप उघडून अंगठी चिन्हावर फुली मारलेल्या मतपत्रिका मोठ्या संख्येने निघाल्या असून एका मतपेटीतून एक चिठ्ठी कमी निघाली. या सर्व बाबी घडून येण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस.डी.देवरे आणि त्यांचे सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप बन्सोड हे जबाबदार आहेत. त्यामुळे सत्ताधारी एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी हेमंत जंबेवार, डॉ.बलवंत लाकडे, शशिकांत साळवे आणि निवडणूक निर्णय अधिकारी एस.डी.देवरे, दिलीप बन्सोड यांचे मोबाईल डिटेल्स घेऊन वरिष्ठ स्तरावरून, ही निवडणूक सत्तेचा वापर करून जिंकल्याबाबत चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे रितसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही उमेदवारांनी सांगितले.

 

 

पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, शामसुंदर उराडे,जयश्री वेळदा, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, कैलास शर्मा, उमेदवार चंद्रकांत भोयर, योगाजी चापले, नितिन मेश्राम, श्रीकृष्ण नैताम, तुळशीदास भैसारे, भास्कर ठाकरे, सुजाता रायपुरे, देवेंद्र भोयर, रेवनाथ मेश्राम, विनोद मेश्राम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here