Gadchiroli district highlights.24/11/2022
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांच्या अधिकारांचे हनन आणि अवैध वाळू उत्खनन तसेच पेसा क्षेत्रातील ओबीसी आरक्षण व वनाधिकार कायद्यांची अंमलबजावणी हे विषय प्रकर्षाने चर्चेला येणार असून जिल्ह्यातील खदान विरोधी संघर्षाला जाहीर समर्थन देणार….
गडचिरोली,ता.२४: भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधीमंडळातील ज्येष्ठ सदस्य आ.भाई जयंत पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी(ता.२५) गडचिरोलीत दाखल होत आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक २६ व २७ नोव्हेंबरला गडचिरोली येथील बँक ऑफ इंडियासमोरील हॉटेल लेक व्ह्यू येथे होणार आहे. या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील, आ. शामसुंदर शिंदे, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्ष सुप्रिया पाटील, पुरोगामी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष आशा शिंदे, पुरोगामी युवक संघटने राज्याध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख, माजी आमदार संपतबापू पवार, माजी आमदार धैर्यशीलपाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार विवेकानंद पाटील, प्रा एस.व्ही.जाधव, कार्यालयीन चिटणीस ॲड.राजेंद्र कोरडे उपस्थित राहणार आहेत. शिवाय राज्यभरातील दीडशेहून अधिक प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार आहेत.
आ.जयंत पाटील हे शुक्रवारी गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर विविध ठिकाणी भेटी देणार असून, शेतकरी, मजूर, कामगार आणि विविध समुहांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. शिवाय ते जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती शेकापच्या राज्य मध्यवर्ती समितीचे सदस्य तथा जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी दिली.