गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरात असलेल्या श्री गॅस एजन्सी (एचपी गॅस वितरक) कडून गॅस वितरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. पूर्वीचा सिलेंडर घेतल्यानंतर 25 दिवसांनी पुन्हा बुकिंग करण्याची अट पूर्ण करूनही, तसेच बुकिंगनंतर ओटीपी मिळाल्यानंतरही तब्बल 17 दिवस उलटून गेल्यानंतरही अनेक ग्राहकांना सिलेंडर घरपोच मिळाला नाही. त्यामुळे एकूण 42 दिवसांचा कालावधी उलटूनही ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध झाला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सुभाष वॉर्ड परिसरातील अनेक ग्राहकांनी 24 आणि 27 मार्च रोजी बुकिंग करून ओटीपी मिळाल्याचे सांगितले. मात्र, ओटीपी मिळूनही 17 दिवस उलटून गेले तरी सिलेंडर न मिळाल्याने ग्राहकांनी एजन्सीकडे चौकशी केली. त्यावेळी एजन्सीच्या संचालकाच्या मुलाने समाधानकारक उत्तर न दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेत जिल्हा पुरवठा विभागाने निरीक्षण अधिकारी वैशाली आंबेकर यांना चौकशीसाठी एजन्सीवर पाठवले. चौकशीदरम्यान 5 आणि 6 एप्रिल रोजीच्या बुकिंगवर सिलेंडर वितरण झालेले आढळले, परंतु 20 आणि 27 मार्चच्या बुकिंग असलेल्या ग्राहकांना अद्याप सिलेंडर मिळालेला नाही, हे स्पष्ट झाले. निरीक्षण अधिकाऱ्यांनी ग्राहकांचे निवेदन नोंदवून त्याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल व संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
प्रशासनाकडून जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात एजन्सीकडे दररोज सिलेंडरचा पुरवठा होत असतानाही ग्राहकांना 25 ते 55 दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, शहरातील भारत गॅस वितरक राजकुमार गॅस एजन्सी काही दिवसांपूर्वी बंद झाल्यानंतर त्यांचे सर्व ग्राहक दुसऱ्या एजन्सीकडे जोडण्यात आले. मात्र, त्या ग्राहकांना ग्रामीण भागातील ग्राहक म्हणून दाखवून जवळपास 55 दिवसांपर्यंत सिलेंडर न दिल्याची तक्रारही पुढे आली आहे.
ग्राहकांनी पुरवठा विभागाला स्पष्ट इशारा दिला आहे की, तात्काळ सिलेंडर वितरण सुरळीत केले नाही, तर संबंधित एजन्सीविरोधात पोलीस तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाईल.




