Home राजकीय गडचिरोलीत काँग्रेसचे ‘१०८ हनुमान चालीसा’ आंदोलन; प्रत्यक्षात फक्त ३ वेळा पठण करून...

गडचिरोलीत काँग्रेसचे ‘१०८ हनुमान चालीसा’ आंदोलन; प्रत्यक्षात फक्त ३ वेळा पठण करून कार्यक्रम आटोपला…

0
727

 

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ ‘१०८ हनुमान चालीसा पठण’ करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात हा कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे न होता केवळ तीन वेळा हनुमान चालीसा पठण करून अल्पावधीत आटोपल्याने या आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आज शहरातील आराध्य दैवत असलेल्या सेमाना देवस्थान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला हनुमान चालीसा पठण करण्यात आले, त्यानंतर धार्मिक विधी व हवन करून काँग्रेस नेत्यांनी राजकीय भाषणे केली. मात्र जाहीर केलेल्या ‘१०८ वेळा पठण’ या संकल्पाच्या तुलनेत कार्यक्रम लवकर आटोपल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाने पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. धार्मिक स्थळाचा गैरवापर होऊ नये या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. तरीही परवानगीशिवाय कार्यक्रम पार पडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कार्यक्रमाचा कालावधी चार ते सहा तास चालण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रम अल्पावधीत संपल्याने पोलिस प्रशासनालाही सुटकेचा श्वास मिळाल्याची चर्चा आहे. या ठिकाणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, धार्मिक स्थळाचा वापर राजकीय आंदोलनासाठी केल्याबद्दल शहरातील विविध स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकारावर सत्ताधारी पक्षातील स्थानिक नेते किंवा जनप्रतिनिधींनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

तसेच, मंदिराच्या विश्वस्त मंडळाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता कार्यक्रम पार पडल्याचा आरोप होत असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. धर्मदाय आयुक्त तसेच जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

यापूर्वीही धार्मिक स्थळांचा वापर आंदोलनासाठी केल्याच्या घटना घडल्या असल्याने भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाकडून धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आखावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकूणच, मोठ्या घोषणांसह सुरू झालेले काँग्रेसचे ‘१०८ हनुमान चालीसा’ आंदोलन प्रत्यक्षात अल्पावधीत आटोपल्याने पक्षाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या संपूर्ण प्रकारामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here