गडचिरोली :
जिल्ह्यातील विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या 108 हनुमान चालीसा पठण कार्यक्रमावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. धार्मिक स्थळावरूनच आंदोलन करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या पद्धतीवर नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
काँग्रेसच्या वतीने मंगळवार, 24 मार्च 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता चामोर्शी रोडवरील श्रीक्षेत्र सेेमाना देवस्थान येथे 108 हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “देवाभाऊ धाव रे… आम्हा पाव रे…” अशा घोषणांसह जिल्ह्यातील समस्या मांडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेसने यापूर्वीही याच धार्मिक स्थळी यज्ञ करून “देवाभाऊ गडचिरोलीला कधी येणार?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे पुन्हा त्याच मंदिराचा वापर करून आंदोलन केल्याने या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
धार्मिक स्थळाचा वापर की राजकीय रणनीती?
राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे की, काँग्रेस पक्ष वारंवार सरकारवर टीका करण्यासाठी धार्मिक स्थळांचा आधार घेत आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा थेट सत्ताधाऱ्यांसमोर जाऊन आंदोलन करण्याऐवजी मंदिरासारख्या पवित्र स्थळाचा वापर करून विरोध व्यक्त केला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
यामुळे नागरिकांमध्येही शंका व्यक्त केली जात आहे. “विरोधी पक्ष हा केवळ राजकारण करण्यासाठी धार्मिक स्थळांचा गैरवापर करतोय काय?” असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
काँग्रेसचे मुद्दे कायम….
तथापि, काँग्रेसकडून या कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यातील अनेक गंभीर प्रश्न मांडले जाणार आहेत.
वाढते अपघात आणि अपुऱ्या उपाययोजना
शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण
रानटी हत्ती व वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान
खराब रस्ते आणि आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था
डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता
बेरोजगारी आणि स्थानिकांना रोजगारात प्राधान्य
शासकीय विभागांतील रिक्त पदे
वाढती लोडशेडिंग
प्रलंबित वनपट्टे
या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. धार्मिक पद्धतीने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
एकीकडे जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन आणि दुसरीकडे धार्मिक स्थळांचा वापर—या दोन्ही गोष्टींमुळे काँग्रेसच्या भूमिकेवर आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या आंदोलनातून सरकारवर कितपत दबाव निर्माण होतो आणि नागरिकांच्या शंका कितपत दूर होतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.




