Home ब्रेकिंग न्यूज समता (कैकाडी वस्ती)नगरसमोर भीषण अपघात – स्कॉर्पिओ दुचाकी ची आमने सामने धडक…...

समता (कैकाडी वस्ती)नगरसमोर भीषण अपघात – स्कॉर्पिओ दुचाकी ची आमने सामने धडक… दुचाकीस्वार जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी…

0
4944

 

गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चामोशी रोडवरील समता नगरसमोर आज दुपारी सुमारे दीड वाजताच्या सुमारास स्कार्पिओ आणि दुचाकी यांच्यात भीषण आमने-सामने धडक होऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात मृत व्यक्तीची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, स्कार्पिओ वाहन चामोर्शीहून गडचिरोली शहराकडे येत होते, तर दुचाकीस्वार इंदिरा गांधी चौकाकडून समता नगर (कैकाडी वस्ती) येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. समता नगरच्या वळणाजवळ पोहोचताच दुचाकीस्वाराने अचानक उजवीकडे वळण घेतले. याच वेळी समोरून येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाला त्याची जोरदार धडक बसली.

या अपघातात दुचाकीस्वार हेमंत देवनाथ शेंडे (वय ४६, रा. औंधी, जिल्हा मानपूर, छत्तीसगड – सध्या मुक्काम समता नगर, गडचिरोली) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी नीतू हेमंत शेंडे (वय ३७) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

अपघातानंतर स्कार्पिओ चालक सुधीर भुरले (वय ३१, रा. गडचिरोली) यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत जखमी महिलेला व मृतदेहाला सामान्य रुग्णालयात हलवले. त्यानंतर त्यांनी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दुचाकीस्वाराने वळण घेताना योग्य खबरदारी घेतली नाही. घर अगदी जवळ आल्यामुळे क्षणभर थांबून पाहिले असते, तर हा अपघात टाळता आला असता, असेही काही नागरिकांनी सांगितले. तर स्कार्पिओ चालकाने सांगितले की, तो स्वतःच्या योग्य बाजूने वाहन चालवत होता; मात्र दुचाकी अचानक समोर आल्यामुळे ब्रेक लावण्याचा प्रयत्न करूनही धडक टाळता आली नाही.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

शहरात वाढत्या बेदरकार वाहनचालना, वाहतुकीचे नियम न पाळणे आणि वळणांवर योग्य काळजी न घेणे यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here