Home राजकीय भेंडाळा येथील सुपीक जमीन अधिग्रहणाच्या विरोधात १२ मार्चला धरणे-मुंडन आंदोलन; संत मुरलीधर...

भेंडाळा येथील सुपीक जमीन अधिग्रहणाच्या विरोधात १२ मार्चला धरणे-मुंडन आंदोलन; संत मुरलीधर महाराज स्वतः मुंडन करणार, काँग्रेसचा जाहीर पाठिंबा…

0
636

 

गडचिरोली, दि. ११ मार्च :

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित जेएसडब्ल्यू प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भूसंपादनाला स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून या विरोधाला आता आंदोलनाचे स्वरूप येत आहे.

भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमिनी एमआयडीसी व औद्योगिक प्रकल्पासाठी अधिग्रहित करू नयेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने १२ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या आंदोलनाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेसच्या वतीने आगामी काळात ‘जेल भरो आंदोलन’ करण्यात येईल. तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखा पठाण, नेताजी गावतुरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, अनिल कोठारे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, प्रभाकर वासेकर, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, श्रीनिवास ताडपलीवार, संजय गावडे, संजय चन्ने, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, धीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, स्वप्निल बेहेरे, कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, पौर्णिमा भडके, रिता गोवर्धन, मंजू आत्राम, मीनल चिमूरकर, शीतल ठवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आरोप केला की, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा हे सरकारमधील काही लोकांच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी हिटलर सारखे मनमानी पद्धतीने आदेश काढत असल्यामुळे भूसंपादन होणाऱ्या परिसरात नागरिकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. सरकार तसेच खाण माफियांच्या हितासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

तसेच १२ मार्च रोजी होणाऱ्या या आंदोलनात हरणघाट मंदिराचे धर्माचार्य संत मुरलीधर महाराज देखील सहभागी होणार असून सरकारच्या निषेधार्थ ते स्वतःचे मुंडन करून आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

भेंडाळा परिसरातील सुपीक जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून आता जिल्ह्यात मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत असून प्रशासन या आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here