गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पावसाळी हंगामातील धान आदिवासी विकास महामंडळ तसेच विविध सहकारी सोसायट्यांमार्फत विक्रीस दिले. मात्र धान विक्रीनंतर शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले संपूर्ण चुकारे अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. डिसेंबर महिन्यात केवळ एकदाच काही प्रमाणात चुकारा देण्यात आला, त्यानंतर आजतागायत उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने वारंवार प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली, तरीही थकीत चुकारे मिळण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. अखेर या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना लोकसभा संघटक सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा. आशिष जयस्वाल यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात पावसाळी हंगामात विक्री केलेल्या धानाचे उर्वरित चुकारे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी करण्यात आली. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांना या प्रकरणी आवश्यक कार्यवाही करून शेतकऱ्यांना थकीत चुकारे तातडीने देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख लोमेश हरडे, संजय बनपुरकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांचे थकीत चुकारे लवकरात लवकर मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




