Home राजकीय मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रेल्वे कामांवर काँग्रेस आमदारांची गुंडागर्दी? मजुराला मारहाण प्रकरणी रामदास मसराम...

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रेल्वे कामांवर काँग्रेस आमदारांची गुंडागर्दी? मजुराला मारहाण प्रकरणी रामदास मसराम यांच्यासह सहा जणांवर गुन्हा; रेल्वे अधिकाऱ्यांचा गंभीर आरोप.

0
1693

 

गडचिरोली : वडसा–गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामादरम्यान एका मजुराला बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणी आरमोरीचे काँग्रेस आमदार रामदास मसराम आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांविरुद्ध देसाईगंज पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, ही घटना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडल्याने विकासकामांवर राजकीय हस्तक्षेप आणि गुंडागर्दी होत असल्याचा आरोप रेल्वे अधिकाऱ्यांनी केला असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री रेल्वे कामाच्या ठिकाणी जाऊन मजुराला मारहाण केल्याचा आरोप…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडसा–गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरात रेल्वेसाठी मुरुम उत्खनन करून भराव टाकण्याचे काम सुरू होते.

मंगळवारी (ता. १७) मध्यरात्री आमदार रामदास मसराम हे त्यांच्या सहकाऱ्यांसह कामाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी उत्खननाच्या परवानगीबाबत मजुरांना जाब विचारला. यावेळी मजूर कुणाल राजगडे यांनी तहसील कार्यालयाची परवानगी असल्याचे सांगत अधिक माहिती कंत्राटदाराकडून घेण्याचे सांगितले.

मात्र, या उत्तरामुळे संतप्त झालेल्या सहकाऱ्यांनी कुणाल राजगडे याला काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आमदारांसह सहा जणांवर गुन्हा दाखल…

या प्रकरणी पोलिसांनी आमदार रामदास मसराम, धनपाल मिसार, सागर वाढई, अमोल मिसार, ज्ञानदेव पिलारे आणि विजय बुरले यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 118(1), 189(1), 190 आणि 191(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, आरोपींवर बेकायदेशीर जमाव करून मारहाण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून तपास सुरू आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचा गंभीर आरोप – “राजकीय दबावामुळे विकासकामे अडथळ्यात”

रेल्वे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर गंभीर आरोप करत सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मात्र काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडून वारंवार कामाच्या ठिकाणी येऊन शिवीगाळ करणे, धमक्या देणे आणि कामात अडथळे निर्माण करणे असे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी खंडणीसाठी दबाव टाकण्याचाही प्रयत्न होत असल्याचा आम्हाला संशय आहे.”

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, येत्या मे महिन्यापर्यंत वडसा ते आरमोरी दरम्यान रेल्वे सुरू करण्याचे नियोजन आहे, मात्र अशा घटनांमुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत.

आमदार मसराम यांनी आरोप फेटाळले…

दरम्यान, आमदार रामदास मसराम यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “मुरुम उत्खननाबाबत स्थानिक शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मी पाहणीसाठी गेलो होतो. आम्ही कुणालाही मारहाण केलेली नाही. उलट तेथील काही लोकांनीच आमच्याशी वाद घातला आहे”

घटनेमुळे राजकीय वातावरण तापले…

एका विद्यमान आमदारावर थेट गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच रेल्वेसारख्या महत्त्वाच्या विकासकामांवर राजकीय गुंडागर्दी होत असल्याचा आरोप झाल्याने प्रशासन आणि राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, ही मारहाण नेमकी कशामुळे झाली, यामागे अवैध उत्खननाचा मुद्दा आहे की अन्य काही कारण, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here