Home राजकीय भाजप नेत्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिले निवेदन; सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष होत...

भाजप नेत्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिले निवेदन; सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप…

0
380

जंगली हत्तीचा धुमाकूळ; आठ गावांतील शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त…

गडचिरोली :

तालुक्यातील चिंचोली, मोहटोला, बेलगाव, रानखेडा, मौशीखांब, मरेगाव चक, मरेगाव, चांभार्डा व खैरी रिठ या गावांच्या शिवारात जंगली हत्तीने घातलेल्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक शेतात घुसलेल्या हत्तीने उभी पिके तुडवत अनेक शेतांमधील पीक पूर्णतः उद्ध्वस्त केले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच अवकाळी पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरतेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जंगली हत्तीच्या धुमाकुळामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी हत्ती वस्तीच्या आसपास येत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर बाधित गावांतील शेतकरी व नागरिकांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत ब्राह्मणवाडे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून भरपाई देण्यात यावी, अशी ठोस मागणी केली.

तसेच जंगली हत्तींचा त्वरित बंदोबस्त करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

या वेळी तालुकाध्यक्ष वसंत राऊत, पांडुरंग समर्थ (अध्यक्ष, वन समिती मौशीखांब), बंडुजी लटारे (अध्यक्ष, वन समिती बेलगाव), शंकर नैताम (माजी पंचायत समिती सदस्य), जगदीश कुणघाडकर, पुंडलिक कोठारे (उपाध्यक्ष, वन समिती बेलगाव), अमृत वासेकर, परसराम कोठारे, शंकरराव भांडेकर, नाजुकराव जुमनाके, मुकुंदा नैताम, बाबुराव चौधरी, बाबुराव हरडे, भक्तदास खेवले, राजेश नानाजी, प्रदीप टेकाम, उमाजी वलादी आदी उपस्थित होते.

विशेष म्हणजे पांडुरंग समर्थ (भाजप ज्येष्ठ नेते), शंकर नैताम (माजी पंचायत समिती सदस्य) आणि बंडुजी लटारे (भाजप कार्यकर्ते) हे सत्ताधारी भाजपशी संबंधित असतानाही त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांना निवेदन दिले. यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? असा तीव्र सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या कार्यप्रणालीवर निष्क्रियतेची टीका होत असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here