Home सामाजिक गडचिरोलीत वाहतुकीचा बोजवारा : नगरपालिका गंभीर नसल्याने नागरिकांच्या जीविताला धोका…

गडचिरोलीत वाहतुकीचा बोजवारा : नगरपालिका गंभीर नसल्याने नागरिकांच्या जीविताला धोका…

0
164

 

गडचिरोली | प्रतिनिधी

शहरातील दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या वाहतुकीकडे स्थानिक नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे धक्कादायक वास्तव गडचिरोली शहरात समोर येत आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, ‘नो पार्किंग झोन’ निश्चित करणे, ‘पे अँड पार्क’ नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच सर्व्हिस रोड मोकळे करून वाहतुकीसाठी योग्य नियोजन करणे ही जबाबदारी नगरपालिकेची असताना, प्रत्यक्षात मात्र या मूलभूत सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे.

विशेष म्हणजे, एसटी महामंडळाच्या बसथांब्यांचे नियोजन कोणत्या ठिकाणी असावे याबाबतही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी, बसथांब्यांच्या आजूबाजूला होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.

गडचिरोली शहरात सध्या केवळ इंदिरा गांधी चौकातच सिग्नल व्यवस्था उपलब्ध आहे, मात्र ही सिग्नल यंत्रणा दिवसातून दोन ते तीन वेळा बंद पडत असल्याचे चित्र आहे. विशेष बाब म्हणजे, ही सिग्नल यंत्रणा एका मोठ्या खासगी कंपनीकडून मोफत स्वरूपात (सप्रेम भेट) देण्यात आली असली, तरी त्याची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी नगरपालिका पार पाडताना दिसून येत नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वाहतुकीच्या संदर्भात स्थानिक पोलीस वाहतूक विभागाकडून माहिती घेतली असता, वाहतूक प्रभारी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शहरातील वाहतूक व्यवस्थेशी संबंधित आवश्यक पायाभूत सुविधा, तांत्रिक सूचना व नियमावली नागरिकांपर्यंत आणि वाहनचालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली जात नसल्यामुळे वाहतूक नियंत्रणात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

“तरीही, वाहतूक विभाग आपल्या नियमावलीच्या आधारे काटेकोरपणे वाहतूक नियंत्रित करत आहे. मात्र जर नगरपालिकेकडून आवश्यक सुविधा आणि सहकार्य मिळाले, तर शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनचालकांचे प्राण धोक्यात येणार नाहीत आणि अपघातांवर निश्चितच आळा घालता येईल,” असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, तांत्रिक अभाव, अपुरी पायाभूत सुविधा आणि नियोजनाचा अभाव यामुळेच शहरात वारंवार अपघात होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. वाहतूक विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत असताना, स्थानिक प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास नागरिकांचे जीवन सुरक्षित कसे राहणार? असा थेट सवाल आता गडचिरोलीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here