गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली शहरातील प्रमुख रस्ते व चौकांवर बिनधास्तपणे उभी केली जाणारी अवजड, चारचाकी व दुचाकी वाहने ही आता शहरासाठी गंभीर डोकेदुखी ठरत असून, यामुळे मोठ्या अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाहतूक विभाग व आरटीओ परिवहन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, प्लॅटिनम शाळा,बँक ऑफ इंडिया, कॉम्प्लेक्स रोड, तसेच मारुती शोरूम परिसर, कारगिल चौकातील गोकुळ नगरकडे जाणारा वळणमार्ग या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी दररोज अनेक प्रकारची वाहने थेट रस्त्यावरच उभी राहत आहेत. बँकांमध्ये ये-जा करणाऱ्या खातेदारांची दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या मधोमध उभी राहत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
चंद्रपूर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर खनिज वाहतूक करणारे पाच ते दहा अवजड ट्रक रस्त्याच्या कडेला उभे राहत असल्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरून येणाऱ्या वाहनचालकांना मुख्य महामार्गावरील वाहने स्पष्ट दिसत नाहीत. परिणामी, येथे कधीही गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात कुठेही अधिकृत पार्किंग झोन उपलब्ध नसल्यामुळे नागरिक खरेदी, बँक व्यवहार किंवा दैनंदिन कामांसाठी थेट रस्त्याच्या बाजूलाच वाहने उभी करत आहेत. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन समोरून येणाऱ्या वाहनांना जागा अपुरी पडत असून अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, कारगिल चौक, आयटीआय चौक तसेच न्यायालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील चौकांवर वाहतूक सिग्नल नसल्यामुळे चारही दिशांनी येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी उपस्थित असले तरी बेदरकारपणे वाहन चालवणारे चालक, भरधाव वेग आणि नियमांचे उल्लंघन यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे.
याशिवाय, रेती तस्करीत गुंतलेली अवजड वाहने कारवाईपासून बचावासाठी भरधाव वेगाने शहरातून जात असल्याने नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. कर्कश हॉर्न, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर, काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट लावलेली वाहने यावरही संबंधित विभागांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
इंदिरा गांधी चौक परिसरातील महिला व बाल रुग्णालयासमोर तसेच त्या परिसरातील हॉटेलांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत आहेत. यामुळे रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच एसटी महामंडळाच्या बसेस ठरलेल्या थांब्याऐवजी चौकातच प्रवासी उतरवत असल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढतो आहे.
या पार्श्वभूमीवर,रस्त्यावर उभ्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी,शहरात नियोजनबद्ध पार्किंग झोन निर्माण करावेत,बेशिस्त व नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, तसेच एसटी महामंडळाला ठरलेल्या थांब्यावरच बसेस थांबवण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी जोरदार मागणी गडचिरोली शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वेळीच उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.




