गडचिरोली :
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अखेर निसटता विजय मिळाला असला, तरी पक्षाला अपेक्षित असलेली एकहाती आणि एकतर्फी सत्ता मिळवण्यात अपयश आले आहे. उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांऐवजी मोठ्या आर्थिक ताकदीच्या ‘आयात’ उमेदवाराला संधी दिल्याने भाजपमध्येच मोठी नाराजी निर्माण झाली होती. त्याचा फटका निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला.
निवडणूकपूर्व काळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची वाढती ताकद आणि प्रचारात निर्माण झालेली हवा पाहता खरी लढत भाजप व राष्ट्रवादी यांच्यात होणार असल्याचे चित्र होते. अखेरच्या निकालात भाजपला एकूण २७ नगरसेवकांपैकी फक्त १५ नगरसेवक निवडून आणता आले. त्यामुळे भाजप बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचला असला, तरी त्यांचा विजय अत्यंत मर्यादित ठरला.
मागील निवडणुकीत केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाने यावेळी मोठी झेप घेत सहा नगरसेवक निवडून आणले. तर यापूर्वी फारसे अस्तित्व नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) नेही पाच नगरसेवक निवडून आणत आपली ताकद सिद्ध केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने दुसरा क्रमांक पटकावत भाजपसमोर कडवी टक्कर उभी केली.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर यांना ११,७६२ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवार अश्विनी रवींद्र नैताम खोब्रागडे यांना ६,९२३ मते मिळत त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. तर काँग्रेसच्या कविता सुरेश पोरेड्डीवार यांना ६,०९४ मते मिळाली. एकूण २९,७५१ मते पडली असून त्यापैकी सात मते अवैध ठरली. प्रणोती निंबोरकर यांनी प्रतिद्वंदी अश्विनी खोब्रागडे यांचा ४,९५८ मतांनी पराभव केला.
निवडणूकपूर्व काळात भाजपकडून एकतर्फी सत्ता मिळणार, असे दावे करण्यात येत होते. मात्र निकालाने हे सर्व अंदाज फोल ठरवले. उमेदवारी देताना नियोजनाचा अभाव, स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आणि नव्या नेत्यांच्या हट्टापायी दिलेल्या उमेदवारीचा फटका भाजपला बसल्याची चर्चा आता खुलेआम सुरू आहे.
एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर आता केवळ १५ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या बळावर मजबूत विरोधी पक्षासमोर भाजपला नगरपालिकेतील कारभार सांभाळावा लागणार आहे. येणाऱ्या काळात गडचिरोली शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात भाजप कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




