Home राजकीय एक मतांनी पराभव; भाजपकडून दबावाचे राजकारण? गडचिरोली नगरपालिकेतील मतमोजणीवर काँग्रेसचे गंभीर आरोप…

एक मतांनी पराभव; भाजपकडून दबावाचे राजकारण? गडचिरोली नगरपालिकेतील मतमोजणीवर काँग्रेसचे गंभीर आरोप…

0
608

 

गडचिरोली :

गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तब्बल १५ उमेदवार निवडून आले असून, त्यांच्या बळावर एकहाती सत्ता स्थापन करणे भाजपसाठी कठीण नाही. मात्र, प्रभाग क्रमांक ५ मधील भाजप उमेदवार संजय सुरेश मांडवगडे यांचा काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांच्याकडून केवळ एक मताने झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून, त्यातूनच सध्या मोठा वाद निर्माण झाल्याचे चित्र मतमोजणी केंद्रावर पाहायला मिळाले.

दिनांक २० डिसेंबर रोजी गडचिरोली शहरातील प्रभाग क्रमांक १, ४ आणि ११ येथे एकाच दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तीन प्रभागांपैकी एका प्रभागात भाजपचा उमेदवार अवघ्या एक मताने पराभूत झाल्याने, उर्वरित प्रभागांचा निकाल डावलून सत्ताधाऱ्यांच्या बळावर निवडणूक यंत्रणेवर दबाव टाकून पराभूत उमेदवाराला विजयी घोषित करण्यासाठी ‘डावपेच’ खेळला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येत थेट सरकार व उच्च पातळीवरून निवडणूक यंत्रणेवर दबाव आणल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजप ‘रडीचा डाव’ खेळत असून, एकतर्फी दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वातावरण मतमोजणी केंद्रावर स्पष्टपणे दिसून आल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

एकाच ठिकाणी व एकाच दिवशी तीन प्रभागांची निवडणूक होऊनही केवळ एका उमेदवारासाठी भाजपकडून एवढी मोठी ताकद लावली जात असल्याने संशय निर्माण होत असल्याचा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आला असून, त्यांनी अकार्यक्षम व निष्काळजीपणे काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मतदान पेट्या ज्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणची चावी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडेच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही मतदान पेट्यांवर सील करताना मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सही नसल्याची धक्कादायक माहिती काँग्रेसचे विजयी उमेदवार श्रीकांत देशमुख यांनी उघड केली आहे.

सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार असल्याचे जाहीर असतानाही तब्बल पावणे दोन तासांनंतर पहिली आकडेवारी जाहीर करण्यात आली. याशिवाय मतमोजणी केंद्रावर पत्रकारांसाठी कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याचेही दिसून आले.

निवडणूक यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने काम करत असून लोकशाही मूल्यांना तडा जात असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here