Home गडचिरोली अतिसंवेदनशील तुमरकोठी येथे नवीन पोलीस स्टेशन कार्यान्वित २४ तासांत उभारलेले पोलीस...

अतिसंवेदनशील तुमरकोठी येथे नवीन पोलीस स्टेशन कार्यान्वित २४ तासांत उभारलेले पोलीस ठाणे; माओवादग्रस्त भागाच्या सुरक्षेत ऐतिहासिक टप्पा…

0
224

 

गडचिरोली, दि. १९ डिसेंबर २०२५ :

माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील आणि दुर्गम-अतिदुर्गम भागांचा समावेश असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने उपविभाग हेडरी अंतर्गत तुमरकोठी येथे नवीन पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. अवघ्या २४ तासांत उभारण्यात आलेल्या या पोलीस स्टेशनचे उद्घाटन आज मोठ्या थाटात पार पडले.

पोलीस स्टेशन तुमरकोठी हे पोस्टे कोठीपासून ७ किलोमीटर आणि छत्तीसगड राज्य सीमेपासून केवळ २ किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम परिसरात असून, या भागातील आदिवासी नागरिकांची सुरक्षा बळकट करत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे पोलीस ठाणे मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले.

 

२४ तासांत विक्रमी उभारणी…

 

नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीसाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामध्ये १००० सी–६० कमांडो, २१ बीडीडीएस पथके, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी तसेच खाजगी कंत्राटदारांचा सहभाग होता. सुमारे १०५० मनुष्यबळ, ४ जेसीबी, २ पोकलेन, ७ ट्रेलर आणि २५ ट्रक यांच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली.

 

आधुनिक सुविधांनी सुसज्ज पोलीस स्टेशन…

 

नवीन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दलासाठी वाय-फाय सुविधा, १२ पोर्टा केबिन, जनरेटर शेड, आरओ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉवर, स्वच्छतागृहे, तसेच सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी. मोर्चा आणि ८ सॅन्ड मोर्चे उभारण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने येथे २ अधिकारी व ५२ अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप-१२ (हिंगोली) ची २ प्लाटून, सीआरपीएफ १९१ बटालियनच्या एफ कंपनीचे एक असिस्टंट कमांडन्ट व ७९ अधिकारी/अंमलदार, तसेच विशेष अभियान पथकाचे ८ पथके (२०० कमांडो) तैनात करण्यात आले आहेत.

जनजागरण मेळाव्यातून पोलिस–जनसंपर्क…

 

पोलीस स्टेशनच्या उभारणीप्रसंगी आयोजित जनजागरण मेळाव्यात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महिलांना साड्या व चप्पल, पुरुषांना ब्लँकेट व घरगुती साहित्य, युवकांना लोअर, टी-शर्ट, नोटबुक, शालेय बॅग, तसेच लहान मुलांना क्रिकेट व व्हॉलीबॉलसह विविध खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे पोलीस व नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

 

वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्यात या अतिदुर्गम भागात नवीन रस्त्यांचे बांधकाम व एस.टी. बस सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

 

उद्घाटनप्रसंगी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडन्ट सत्य प्रकाश, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, पोलीस अंमलदार व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here