Home ब्रेकिंग न्यूज गोंडवाना विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर उघड; शहरातून 34 सिलेंडर जप्त,...

गोंडवाना विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर उघड; शहरातून 34 सिलेंडर जप्त, आवश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत कारवाईची मागणी…

0
293

 

गडचिरोली :

गोंडवाना विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुरवठा विभागाने चार दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडीत उघडकीस आला आहे. या कारवाईत विद्यापीठातील कॅन्टीनसह शहरातील विविध ठिकाणांहून एकूण 34 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, केवळ विद्यापीठ कॅन्टीनमधूनच 3 सिलेंडर आढळल्याने खळबळ उडाली आहे.

 

गेल्या एक महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, प्रत्येक गॅस एजन्सीसमोर हजारो ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडर मिळत नसताना, घरगुती वापरासाठी असलेले सिलेंडर हॉटेल व व्यावसायिक वापरासाठी वळविले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

 

सिलेंडर पुरवठा होत नसल्याबाबत अनेक नागरिकांनी पुरवठा विभाग व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या तक्रारींमध्ये उज्ज्वला गॅस योजनेतील ग्राहकांच्या नावावर सिलेंडर विक्री दाखवून तेच सिलेंडर हॉटेल व्यावसायिकांना दामदुप्पट दराने विकले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांमध्ये घरगुती सिलेंडरच्या गैरवापरासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते.

 

या चौकशीदरम्यान गोंडवाना विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर सुरू असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, घरगुती सिलेंडरचा गैरवापर हा आवश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत गंभीर गुन्हा असतानाही, तसेच असा सिलेंडर पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सी धारकांवरही कारवाई अपेक्षित असताना, अद्याप कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

 

दरम्यान, या प्रकरणी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली.

“विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणे चुकीचे आहे. ही बाब गंभीर असून, मी तात्काळ विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांना पाठवून याची दखल घेत आहे. विद्यापीठातील कॅन्टीनमध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य होणार नाही, याची काळजी घेतली जाईल,” अशी ठाम भूमिका कुलगुरूंनी मांडली.

 

एकीकडे विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ कारवाईचे संकेत दिले असताना, दुसरीकडे पुरवठा विभागाने जप्त केलेले सिलेंडर पुन्हा गॅस एजन्सी धारकांच्या ताब्यात दिल्याने आणि आवश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हे दाखल न झाल्याने भ्रष्टाचाराचा संशय अधिक बळावत आहे.

 

घरगुती गॅस सिलेंडरच्या गैरवापर प्रकरणी दोषी आढळणाऱ्या गॅस एजन्सी धारकांवर तसेच हॉटेल व्यावसायिकांवर तात्काळ आवश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी गडचिरोली शहरातील जाणकार नागरिकांकडून होत आहे.

आता प्रशासन या गंभीर प्रकरणात ठोस कारवाई करणार की प्रकरण दडपले जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here