गडचिरोली: दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या 2025 एशियन यूथ पॅरा गेम्समध्ये भारतासाठी सुवर्ण व कांस्य पदक पटकावून उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या कु. श्वेता भास्कर कोवे हिचे नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी यांच्या मार्फत संचालित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी असलेल्या श्वेताने आपल्या जिद्द, मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे.
नागपूर विमानतळावर पोहोचताच अब्दुल जमीर हकीम (बबलू भैया) व सौ. शाहीन ताई हकीम यांच्या हस्ते श्वेताचे फुलहार, पुष्पगुच्छ व अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. ढोल-ताशांच्या निनादात आणि घोषणांच्या गजरात तिचे स्वागत करत उपस्थितांनी क्रीडापटूच्या यशाला मानवंदना दिली.
श्वेताच्या या यशामुळे महाविद्यालय, शिक्षण मंडळासह संपूर्ण गडचिरोली-अहेरी परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या प्रेरणादायी कामगिरीमुळे अनेक युवक-युवतींना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तिला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




