Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोली जिल्हा रुग्णालयात मोठा प्रशासकीय फेरबदल; वादग्रस्त डॉ. वर्षा लहाडे यांची जिल्हा...

गडचिरोली जिल्हा रुग्णालयात मोठा प्रशासकीय फेरबदल; वादग्रस्त डॉ. वर्षा लहाडे यांची जिल्हा शल्य चिकित्सकपदी नियुक्ती, प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह…

0
1337

 

गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला असून जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. माधुरी किलनाके यांची महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांची गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

डॉ. माधुरी किलनाके यांच्या कार्यकाळात त्यांच्या संथ व निष्क्रिय कारभाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती. विविध आढावा बैठकीत त्यांच्या कामकाजावर टीका झाली होती. सहपालकमंत्र्यांनीदेखील बैठकीत त्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. अखेर १६ डिसेंबर रोजी त्यांची महिला व बाल रुग्णालय अधीक्षकपदी बदली करण्यात आली.

दरम्यान, नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. वर्षा लहाडे यांच्या कारकिर्दीवर आधीपासूनच वादाचे सावट आहे. नऊ वर्षांपूर्वी नाशिक येथे गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. तसेच नंदुरबार येथे कार्यरत असताना त्यांच्या कथित हेकेखोर वर्तनाविरोधात कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ आंदोलन केल्याची नोंद आहे.

यामुळे गडचिरोलीच्या वैद्यकीय वर्तुळात “सुस्त गेले आणि वादग्रस्त आले” अशी चर्चा रंगली आहे. यासोबतच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंकी यांचीही बीड जिल्हा शल्य चिकित्सकपदी बदली करण्यात आली आहे.

वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर जिल्ह्याला विकासात अव्वल बनविण्याचा दावा केला होता. मात्र औद्योगिक क्षेत्र वगळता इतर विभागांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक पातळीवर केला जात आहे. अनेक विभागांत निलंबित राहिलेले, भ्रष्टाचार अथवा लाचखोरीच्या प्रकरणांत अडकलेले अधिकारी मोठ्या प्रमाणावर नियुक्त केले जात असल्याचा दावा केला जात आहे.

महसूल व बांधकाम विभागानंतर आता जिल्हा परिषद व आरोग्य विभागातही अशीच स्थिती निर्माण होत असल्याने विकास कामांच्या दर्जावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री यांच्या पालकत्वाखालील गडचिरोली जिल्ह्याचे भवितव्य काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here