गडचिरोली :
शहरातील गजबजलेले सर्वोदय वार्ड आज अक्षरशः घाणीच्या साम्राज्यात बदलले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रस्त्यांवर साचलेले घाण पाणी, खोबऱ्या-खोबऱ्यांतून वाहणारी कीचडमिश्रित दलदल यामुळे नागरिकांना रोजच्या रोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, अलीकडील नगरपरिषद निवडणुकीदरम्यान तर एका मतदान केंद्रात जाण्यासाठी मतदारांना चिखल तुडवत, गोट्यांवर पाय ठेवत जीव मुठीत धरून मतदान करण्यासाठी जावे लागले होते. यावरून वार्डातील मूलभूत सुविधांची किती बिकट अवस्था आहे, याची प्रचिती येते.
नगरपालिका प्रशासनवर दुर्लक्ष केल्याचे आरोप…
स्थानिक नागरिकांनी स्पष्ट आरोप केला आहे की सर्वोदय वार्डातील समस्यांकडे नगरपालिका प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत आहे. प्रचंड घाण, दुर्गंधी, साचलेले पाणी यामुळे गंभीर आरोग्यधोके निर्माण झाले असून डेंग्यू, मलेरिया आणि दूषित पाण्यामुळे होणारे आजार पसरू शकतात.
नागरिकांच्या मते, नगरपरिषदेचा आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभाग “राम भरोसे” चालत असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
वीज खांबही चिखलात अडकले – मोठ्या दुर्घटनेची भीती
काही भागात परिस्थिती इतकी गंभीर आहे की वीज खांबदेखील चिखलात अडकलेले दिसत आहेत. पाणी आणि चिखल साचल्यामुळे लोखंडी खांबांवर विद्युत प्रवाह उतरू शकतो आणि कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तत्काळ स्वच्छता मोहीमेची मागणी…
सर्वोदय वार्डातील नागरिकांनी मुख्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच संपूर्ण वार्डात सफाई मोहीम राबवून रस्ते व नाले स्वच्छ करावेत, तसेच धोकादायक वीज खांबांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशांनी जोरदारपणे केली आहे.
सर्वोदय वार्डातील परिस्थिती सुधारण्यासाठी नगरपालिका प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




