Home ब्रेकिंग न्यूज सुशिक्षित प्रभागात सर्वात कमी मतदान! प्रभाग क्रमांक 7 मध्ये फक्त 58.08% मतदान...

सुशिक्षित प्रभागात सर्वात कमी मतदान! प्रभाग क्रमांक 7 मध्ये फक्त 58.08% मतदान — मतदारांची उदासीनता प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह.

0
362

 

 

गडचिरोली : शहरातील सर्वाधिक सुशिक्षित मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचे आश्चर्यकारक चित्र समोर आले आहे. या प्रभागामध्ये एकूण 2300 मतदार असून त्यापैकी केवळ 1330 मतदारांनीच आज मतदानाचा हक्क बजावला आहे. वाढवून देण्यात आलेली मतदान वेळ – नेहमीच्या साडेतीनऐवजी साडेपाचपर्यंत उपलब्ध असूनही मतदारांचा सहभाग केवळ 58.08% इतकाच राहिला.

 

मतदान प्रक्रियेतील ही घसरलेली टक्केवारी पाहता निवडणुकीत मतदारांचा उत्साह कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. सायंकाळच्या सुमारास मतदान केंद्रावर पाहणी केली असता उमेदवारांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. कारण या प्रभागातील मतदान कमी झाल्यास तीन उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होऊन केवळ 500–550 मतांनीही कोणत्याही उमेदवाराला विजय मिळविण्याची शक्यता निर्माण झाल्याचे राजकीय जानकारांमध्ये चर्चेत आहे.

 

मतदान केंद्रांवरील अव्यवस्था मतदारांना परावृत्त करणारी?

मतदारांकडून मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास मनाई असल्याने अनेकांना आपला किमती मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी व्यक्ती मिळाली नाही. परिणामी “मोबाईल कुणाकडे द्यायचा?” या संभ्रमामुळे अनेकांनी मतदान न करता परत घरी जाण्याचा मार्ग धरल्याचे दिसून आले.

 

शिवाय निवडणूक विभागाने घरपोच मतदारनावाची पर्ची पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जवळपास 50% घरांमध्ये पर्ची पोहोचवलीच नव्हती, अशी गंभीर तक्रार नागरिकांनी केली. यामुळे निवडणूक विभागाच्या कार्यक्षमतेवर आज सर्वत्र शंका व्यक्त होताना ऐकू आली.

 

सोयीसुविधांचा अभाव — प्रशासनावर बोट

निवडणूक नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी स्वतंत्र व्हीलचेअर असणे आवश्यक असते; परंतु पूर्ण शहरात केवळ एका केंद्रावर एकच व्हीलचेअर दिसून आल्याची खंत मतदारांनी व्यक्त केली.

 

कारमेल स्कूलसारख्या मोठ्या मतदान केंद्रावर तर “मतदान केंद्र” असल्याचे दर्शविणारे कोणतेही बॅनर, पोस्टर किंवा सूचना बोर्डच नव्हते. सेल्फी पॉईंटसारख्या मतदारांना आकर्षित करणाऱ्या व्यवस्था नसल्याचा मतदारांनी उल्लेख केला. संबंधित अधिकार्‍यांना याबाबत विचारले असता “संबंधित साहित्य निवडणूक विभागाकडून उपलब्ध झाले नाही” असे उत्तर देण्यात आले.

प्रभाग क्रमांक 2 मध्ये तर प्रवेशद्वारच असुविधाजनक…

एका मतदान केंद्रात जाण्यासाठी चिखलातून गोट्यांवर पाय ठेवत आत प्रवेश करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिसर झुडपी जंगलासारखा असून मतदारांना आत येण्यासाठी अडचण होत असल्याचे स्पष्ट दिसत होते.

मतदान कमी — प्रशासन अपयशी?

जास्त वेळ उपलब्ध करुन दिल्यानंतरही नागरिक मतदानासाठी बाहेर पडले नाहीत. त्याचा अर्थ मतदार व्यवस्थेवर समाधानी नाहीत, असा थेट संदेश देत आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शहरातील मतदारांची उदासीनता हे प्रशासनाचे अपयश असल्याचे स्पष्ट मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.

 

दरम्यान, प्रभाग क्रमांक 7 मध्ये अखेर मतदानाची टक्केवारी 58.08% नोंदली गेली असून आता सर्वांचे लक्ष 21 तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे लागलेले आहे. मतदानाच्या दिवसाला प्रशासनाने केलेल्या तयारीवरून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसंबंधी आणि मतदार सहभागाबाबत आता नवे प्रश्न जन्मास येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here