Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोली–उमरखेड एसटी बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला; गंभीर जखमी रूपाली खनके यांचे...

गडचिरोली–उमरखेड एसटी बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला; गंभीर जखमी रूपाली खनके यांचे नागपुरात उपचारादरम्यान निधन…

0
1016

गडचिरोली : गडचिरोलीवरून उमरखेडकडे जात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला मूर्खडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूपाली नीलकंठ खनके (वय ३० वर्षे) यांचे नागपूर येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान 26 मे रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली–उमरखेड मार्गावरील एसटी बसचा मूर्खडा गावाजवळ भीषण अपघात झाला होता. बस चालकाचा ताबा सुटल्याने बसने दोन पलट्या घेत रस्त्याच्या कडेला पलटी मारली होती. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी रूपाली खनके यांना गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते.

नागपूरमधील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान काल दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे खनके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या भीषण अपघातात यापूर्वीच ख्वाजा शहाबुद्दीन, एका महिलेसह एका चिमुकल्या बालकाचा मृत्यू झाला होता. रूपाली खनके यांच्या निधनानंतर मृतांचा आकडा आणखी वाढला असून जिल्ह्यात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप अनेक जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

अपघातानंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्राथमिक स्वरूपात प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत, तर जखमी प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्राथमिक स्वरूपात प्रत्येकी १ हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याशिवाय गंभीर जखमींना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या अपघातानंतर एसटी महामंडळ, परिवहन विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बस चालकाचा निष्काळजीपणा, वाहनावरील नियंत्रण सुटण्यामागील कारणे तसेच इतर तांत्रिक बाबींची चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात बसची स्थिती चांगली असल्याचे समोर आले असून अपघातामागील वास्तविक कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनेने नागरिकांमध्ये संताप आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातग्रस्त कुटुंबांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी परिवहन व्यवस्थेत अधिक दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, मृतांना श्रद्धांजली आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here