इंदिरा गांधी चौकातील ‘सिग्नल बंद’ संकट — वाहतूक पोलिसांचा निष्क्रियपणा उघड, नागरिकांचा जीव धोक्यात…
गडचिरोली: शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि गर्दीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या इंदिरा गांधी चौकात दररोज सिग्नलच्या बिघाडामुळे वाहतूक कोंडी होत असून त्यातून नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपालिकेच्या नियंत्रणात असलेले या चौकातील सिग्नल दिवसातून किमान तीन वेळा बंद पडतात आणि वारंवार दुरुस्ती करूनही ते नियमित सुरू राहतील याची खात्री प्रशासन देऊ शकत नाही. त्यामुळे चौकातील वाहनवाहतुकीचे प्रभावी व्यवस्थापन कोलमडले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेची जाणीव तीव्र होत आहे.
सिग्नल बंद असतानाही वाहतूक पोलिसांची उपस्थिती असून त्यांनी प्रत्यक्ष चौकात उभे राहून वाहतुकीचे नियंत्रण करण्याऐवजी कोपऱ्यात बसून वाहनांची तपासणी व दंड वसुली करण्यात अधिक रस दाखविल्याचे नागरिकांचे निरीक्षण आहे. त्यांची भूमिका “सिग्नल असेल तरच काम, नसेल तर नाही” अशी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तिथे चारचाकी, दुपहिया, रिक्षा, अवजड वाहने अशी प्रचंड गर्दी असताना दोन्ही बाजूंनी वाहने एकमेकांवर धडक देत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, परिणामी चौकात गोंधळ वाढतो. आधीही या चौकात सिग्नल बंद असताना हलक्या ते गंभीर स्वरूपाच्या दुर्घटना घडल्या आहेत. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा वाहतूक तज्ज्ञांनी दिला आहे.
नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे — “जर यंत्रणा बिघडली तर किमान मनुष्यबळाने तरी नियमन करा!” पण प्रत्यक्षात मात्र चौकातील तीन ते चार कर्मचारी चौकात काम करण्याऐवजी वाहनधारकांना चालन देण्यावरच भर देतात. तसेच वाहतूक विभागाच्या बसण्याच्या खोलीत बसून वेळ घालवण्याचे दृश्यही अनेकदा दिसून येते. हा दृष्टिकोन वाहतूक व्यवस्थापनापेक्षा दंड वसुली अधिक महत्त्वाची असल्याचा आभास निर्माण करतो. यामुळे सिग्नल बंद असताना सुद्धा वाहतूक कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्यापेक्षा फक्त सिग्नल बिघडल्याचा दोष नगर पालिकेवर करतांना दिसून आले होते.
इंदिरा गांधी चौकातील सिग्नलची कायमस्वरूपी दुरुस्ती करून त्याचे तांत्रिक रखरखाव सुनिश्चित करावे, तसेच सिग्नल बंद असताना वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियमन करावे.यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाला पुन्हा एकदा ठाम मागणी केली आहे
शहरातील वाढती वाहनसंख्या, वेगवान वाहतूक आणि रस्त्यांची मर्यादित क्षमता यांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा केवळ तांत्रिक बिघाडाचा नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि जीवनाशी निगडित असल्याचे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.




