Home ब्रेकिंग न्यूज जिल्ह्यातील चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती — राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय…

जिल्ह्यातील चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती — राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय…

0
358

 

गडचिरोली दि. ३० :

नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगात आला असताना राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या नगरपरिषदांमध्ये विशिष्ट प्रभागांविषयी अपील दाखल करण्यात आली होती, आणि त्या अपीलवरील निर्णय २२ नोव्हेंबरनंतर — म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२५ किंवा त्यानंतर देण्यात आले — अशा प्रभागांच्या निवडणुका पूर्वनिश्चित कार्यक्रमानुसार घेऊ नयेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

 

राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी नगरपरिषद सदस्य व अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु प्रलंबित अपीलांचा निकाल विलंबाने लागल्याने, मतदारसंघात गोंधळ किंवा अन्यायाची शक्यता टाळण्यासाठी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाने सुधारित निर्देश जारी करत संबंधित निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

यात महत्त्वाचे म्हणजे— जर त्या अपीलग्रस्त प्रकरणात अध्यक्ष पदाचाही समावेश असेल तर फक्त संबंधित प्रभाग नव्हे तर संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचे अधिकार आयोगाने वापरले आहेत.

 

या सूचनेनुसार गडचिरोली नगरपरिषदेतील प्रभाग 1A, प्रभाग 4B, प्रभाग 11B तसेच आरमोरी नगरपरिषदेतील प्रभाग 10A या एकूण चार प्रभागांच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

 

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संबंधित प्रभागांतील निवडणुका आगामी सुधारित कार्यक्रमानुसार घेण्यात येणार आहेत. सुधारित कार्यक्रमाची घोषणा लवकरच अधिकृतरीत्या केली जाईल.

 

राजकीय दृष्टीने या निर्णयामुळे स्थानिक उमेदवार आणि मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले असून, आगामी नगरपरिषद सत्तासमीकरणांवर या स्थगितीचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here