अंतर्गत नाराजी, उमेदवारीतील गोंधळ आणि ढिसाळ कारभारामुळे काँग्रेसची ‘बुडती नौका’ — राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव
गडचिरोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस फुट वाढत असल्याचे स्पष्ट चित्र आता समोर येत आहे. महिला जिल्हाध्यक्ष आणि एकनिष्ठ कार्यकर्त्या अँड. कविता मोहरकर यांनी आज आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीरपणे प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला महिलांच्या बालेकिल्ल्यात घाव बसला असून राष्ट्रवादीचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला आहे.
बाहेरील उमेदवारांची आयात — जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपमान महागात पडला…
काँग्रेस पक्षाने बाहेरून आणलेल्या उमेदवाराला नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली.
हा उमेदवार आणि त्याचे घराणे गेल्या तब्बल 20 वर्षांपासून शहरावर सत्ता चालवत असूनही गडचिरोलीचा विकास शून्य दर्जाचा राहिल्याची नागरिकांची तीव्र नाराजी आहे.
यामुळे काँग्रेसच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
“रक्ताचं पाणी करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करून आयात उमेदवारांना मान देणे… हे आमच्यासाठी अपमानास्पद आहे!” — अशा भावना पक्षात उघड होऊ लागल्या.
वडेट्टीवारांचे आश्वासनही फसले…
नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी तर चक्क “निवडीनंतर स्वीकृत सदस्य बनवू…” असे आश्वासन दिले — पण या आश्वासनाचा काहीही परिणाम झाला नाही. उलट नाराजी अधिक तीव्र झाली.
काँग्रेसची स्थिती दयनीय जमानत जप्तीच्या चर्चा…
मागील निवडणुकीत काँग्रेसला एकही नगरसेवक जिंकता आला होता.आजच्या परिस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की “एखाद-दोन पराजित उमेदवार सोडले तर उरलेल्या सर्वांची जमानत जप्त होणार.”
कविता मोहरकरांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत उत्साह तर काँग्रेसमध्ये उदासीनता…
कविता मोहरकर यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत महिला संघटनेत जबरदस्त उत्साह दिसला.
उलट काँग्रेसमधील महिला कार्यकर्त्या निराश आणि मनोबल गमावलेल्या दिसल्या.
“आपला पक्ष आपल्याला किंमत देत नाही… फक्त उपयोग करून घेतो” — असे बोलणेही आता खुलेपणाने सुरू आहे.
राष्ट्रवादीचा वाढता ग्राफ — भाजप व काँग्रेसवर मतदारांची नाराजी…
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला अपेक्षेपेक्षा अत्यल्प लोक उपस्थित झाले.
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या रोडशोलाही जेमतेम हजाराच्या आतच लोकांची उपस्थिती राहिली.
यातून स्पष्ट होते की भाजपला नाकारणारा मतदार आणि काँग्रेसवर सूत नक्की नसलेला मतदार हा सरळ राष्ट्रवादीकडे झुकतो आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा… काही प्रभागांतील मतदान थांबवले…
ओबीसी आरक्षणावरील प्रकरण प्रलंबित असल्याने,प्रभाग क्रमांक १, ४ आणि ११ मधील निवडणूक थांबवण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश बाहेर आला आहे.या तीनही प्रभागात भाजपची बाजू कमकुवत असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.
या निर्णयामागे राजकीय स्वार्थ असल्याची शंका विरोधकांकडून व्यक्त होत आहे.
काँग्रेसची अंतर्गत फुट, ढिसाळ नियोजन आणि कार्यकर्त्यांप्रती असंवेदनशील वागणूक यामुळे पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
कविता मोहरकरांसारख्या जेष्ठ आणि शिक्षित नेत्या सोडून जाण्याचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागणार आहे.
आजची वस्तुस्थिती अशी —
राष्ट्रवादीची मतदारांमध्ये जोरदार वाढ
भाजपला कमी प्रतिसाद
आणि काँग्रेस — ‘पाण्यातील बुडता जहाज’




