Home राजकीय गडचिरोलीत वीस वर्ष सत्ता भोगूनही विकास शून्य — काँग्रेस व भाजपविरोधात मतदारांचा...

गडचिरोलीत वीस वर्ष सत्ता भोगूनही विकास शून्य — काँग्रेस व भाजपविरोधात मतदारांचा संताप; राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे शिवसेनेला वाढता पाठिंबा…

0
259

 

 

गडचिरोली — शहरातील वीस वर्षांच्या सत्ताकालात कोणताही उल्लेखनीय विकास न करता चारशे कोटी निधीचा केवळ ‘विकासाचा बनाव’ दाखवणाऱ्या काँग्रेस व भाजपला मतदारांनी हद्दपार करण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. वीस वर्षांपासून नगरपालिकेची सत्ता सांभाळूनही शहरात मोठा औद्योगिक प्रकल्प, पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुधारणा, सार्वजनिक सुविधा, सौंदर्यीकरण — यापैकी एकही मुद्दा समाधानकारक रीतीने हाताळण्यात अपयश आल्याने नागरिकांचा रोष शिगेला पोहोचलेला आहे.

 

याउलट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी उमेदवारीची रणनीती रचनात्मक पद्धतीने आखत विश्वासार्ह आणि जबाबदार नेतृत्व जनतेसमोर उभे केले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांकडे मतदारांचा कौल स्पष्टपणे झुकताना दिसत आहे.

 

काँग्रेसला नगराध्यक्ष पदाकरिता बाहेरून ‘आयात’ उमेदवार आणावा लागल्याने त्यांच्या नेतृत्वावरील स्थानिकांचा विश्वास संपल्याचे स्पष्ट झालं आहे. याच कुटुंबाने वीस वर्ष सत्ता भोगूनही प्राथमिक शाळांचे बांधकाम अर्धवट, नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या आणि शहरातील ओपन स्पेसचे अर्धवट सौंदर्यीकरण — या समस्या सोडवण्यात अपयश आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

दरम्यान, आजपर्यंत कधीही नगरपालिका सत्ता न मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे शहराला विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे. यामध्ये अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे शहरातील जनतेत निरीक्षण आहे.

 

निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी व शिंदे गटाचे पदाधिकारी घरादारात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत, कॉर्नर सभा, छोटेखानी बैठका आणि स्थानिक प्रश्नांवर थेट उत्तरं — यामुळे जनतेचा विश्वास या दोन्ही पक्षांकडे वाढला आहे.

 

याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत अत्यंत कमी प्रमाणात लोकांची उपस्थिती दिसून आली. अपेक्षेपेक्षा खूपच कमी गर्दी झाल्याने भाजपविरोधातील नाराजी अधिक स्पष्ट झाली असून राष्ट्रवादीच्या बाजूने पारडे जड होत असल्याचे दृश्य सभास्थळी दिसत होते.

 

यामुळे सत्ताधाऱ्यांना देखील आता रणनीतीमध्ये बदल करावा लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.

 

यावेळी मतदान दिनांक २ डिसेंबर असून सकाळी ७ ते सायं. ५:३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. या वेळेत मतदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी शक्यता निवडणूक प्रशासनाने व्यक्त केली आहे.

 

निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते लीलाधर भरडकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आणि माजी मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनामुळे शहरातील युवा वर्ग राष्ट्रवादीच्या बाजूने उभा आहे.

 

एकूणच, वीस वर्ष सत्ता गाजवूनही विकास न करणाऱ्या काँग्रेस व भाजपविरोधात स्पष्ट नाराजी आणि दुसरीकडे राष्ट्रवादी व शिंदे गटाला मिळत असलेला वाढता लोकसमर्थनाचा कौल पाहता या निवडणुकीत शहराच्या राजकीय समीकरणात ऐतिहासिक बदल होण्याची शक्यता अधिक दृढ होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here